🔸आपल्या शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जातात…
✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.10जुलै):- शिक्षक म्हणजे आपल्या कार्यरूपाने समाजामध्ये सदैव अधोरेखित होणार व्यक्तिमत्व. प्रत्येक व्यक्ती आपल्या विविध गुणांच्या माध्यमातून जनसामान्यांवर आपली एक वेगळी छाप सोडून जात असतात आणि त्यांच्यातील या नाविन्यपूर्ण स्वभावामुळे, व्यक्तिरेखेमुळे, कौशल्यामुळे त्यांचं एक अढळ स्थान निर्माण होत असतं. आपल्या ध्येय शक्तीने, कल्पकतेने, अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून होत असतं. असंच एक साध सरळ व्यक्तिमत्व ज्यांनी वयाची 28 वर्ष या शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतली ते म्हणजे आपल्या अमळनेर तालुक्यातील दहिवद गावाचे सुपुत्र प्रकाश माणिक शेलकर. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेनंतर 30 जून 2023 रोजी ते सेवानिवृत्त झाले आहेत.
दहिवद येथील अध्यात्मिक व्यक्तिमत्व कै. माणिक लहू शेलकर यांचे द्वितीय सुपुत्र, तसेच दहिवद गावाचे कार्यकुशल माजी सरपंच कै. लक्ष्मण माणिक शेलकर यांचे लहान बंधू. कला शिक्षक आणि आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनचे संस्थापक विनोद शेलकर, कल्याण यांचे काका, श्री.संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे सासरे.
घरातूनच मेहनती, हरहुन्नरी, अध्यात्मिक आणि सामाजिक वारसा लाभलेले प्रकाश माणिक शेलकर हे एक सहृदयी व्यक्तिमत्व. गावातील, नातेवाईकांमध्ये कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहून आपल्या स्नेहबंधाची नाळ त्यांनी गावापासून दूर राहून सुद्धा कधी तुटू दिली नाही. खरंतर अथक परिश्रमानंतर लग्नानंतर लक्ष्मीच्या पावलांनी पदार्पण केल्यानंतर त्यांना नोकरीची संधी मिळाली. आणि त्यांनी त्या संधीचे सोनं ही केलं. त्यांनी २३/०६/१९९५ ला आपल्या सेवाकाळाला पळशी खुर्द कन्नड तालुका येथून सुरवात केली. आपल्या अध्यापनातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. जिल्हा परिषद शाळा म्हटली म्हणजे सातत्याने बदलीचा ससेमेरा मागे असतोच. २००३ पर्यंत तेथे काम केल्यानंतर वाडी पळशी (रामनगर ता.कन्नड) येथे त्यांची बदली झाली. येथे त्यांनी २०१२ पर्यंत आपली सेवा दिली. मग पुढे त्यांची बदली वांगी बु. ता. सिल्लोड येथे झाली. २०१८ पर्यंत त्यांनी येथे सेवा देत. पुन्हा त्यांची बदली वडोद चाथा ता. सिल्लोड इथे झाली आणि शेवटी ३० जून 2023 रोजी ते त्यांचा हा प्रदीर्घ सेवाकाळ संपवून सेवा निवृत्त झालेले आहेत..
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, दहिवद येथे झाले त्यानंतर पाचवीपासून दहावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण नवभारत माध्यमिक विद्यालय, दहिवद या शाळां मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथून डी. एड. करून आपले शिक्षण पूर्ण केले. गावात असतांना आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी विविध नाटकांमध्ये, सांस्कृतिक सहभाग घेतला, तसेच गावातील सांस्कृतिक परंपरेतील रामलीलेत ही त्यांनी अनेक पात्र साकारली आहेत. ते उत्तम वादक ही आहेत. पत्नी उषा या गृहिणी असून मोठे जावई मुकेश महाजन शिरपूर , लहान जावई जितेंद्र महाजन लासूर येथील आहेत, मुलगा कृष्णा आता आर.सी.पटेल कॉलेज ऑफ फार्मसी येथे सहा. प्राध्यापक म्हणून काम पाहत आहे. लहान मुलगी दिपाली ही एम. एस्सी. करत आहे. बहीण कमलबाई किंनगाव येथे गंगाराम विठ्ठल महाजन यांच्याकडे आपल्या संसाराचा गाडा अतिशय नेटाने सांभाळत आहेत. असा हा त्यांचा अतिशय आनंदी परिवार. प्रकाश शेलकर सर यांना पुढील निरामय, निरोगी, आनंदी आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा.. आता त्यांना अजून आपल्यातील कला गुणांना, तसेच परिवाराला वेळ देण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे.