सहसंपादक //उपक्षम रामटेके📱9890949596
चंद्रपूर ९ जुलै – वृक्षाचे महत्व अनन्यसाधारण आहे, आज ग्लोबल वॉर्मिंग ,पावसाची अनिश्चितता यामुळे ऋतूचक्र बिघडत आहे. याला कारण आहे वृक्षांची कमतरता त्यामुळे अधिकाधिक वृक्ष लाऊन ऋतुचक्र नियमित करण्याचे तसेच वृक्ष लागवड मोहीमेला यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ९ जुलै रोजी आयोजीत वटवृक्षारोपण कार्यक्रमात केले.
जिल्हा प्रशासन,चंद्रपूर महानगरपालिका व नटराज निकेतन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वटवृक्ष लागवड मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेअंतर्गत नगिनाबाग प्रभाग येथील शेंडे लेआऊट सह्याद्री उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी बोलतांना आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले की,आज वृक्ष का लावावे याची सर्वांना माहीती आहे गरज आहे ती पुढाकार घेण्याची. आपल्या संस्कृतीत प्रत्येक वृक्षाचे महत्व सणांद्वारे सांगीतले गेले आहे. मात्र आज माणसे वाढत चालली आहेत व निसर्ग कमी होत आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे.
चंद्रपूर मनपाने वृक्षलागवडीस पुढाकार घेतला आहे. शहरासाठी वटवृक्ष लागवड मोहीमेची सुरवात ३ जुन रोजी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी संकुल येथे वटवृक्ष लावुन करण्यात आली होती. सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस या २ स्पर्धांमधुन प्रत्येक परिसरातील नागरीकांना वृक्षांशी जोडण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. स्पर्धेत भाग घेऊन आपण वृक्षांची मागणी करा मनपाद्वारे ते देण्यात येईल मात्र वृक्षाचे संगोपन नागरीकांनी जबाबदारी घेऊन करणे गरजेचे आहे.
माजी सभापती राहुल पावडे यांनी तसेच योगनृत्य परिवारातर्फे गोपाळ मुंधडा व नटराज निकेतन संस्थातर्फे मंगला व मुकुंद पात्रीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी उपायुक्त अशोक गराटे,माजी सभापती राहुल पावडे, शहर अभियंता महेश बारई,उपअभियंता रविंद्र हजारे नटराज निकेतन संस्था अध्यक्षा मंगला पात्रीकर,विलास पात्रीकर,मुकुंद पात्रीकर,योगनृत्य परिवाराचे गोपाल मुंधडा,निखिल व्यास,मधुरा व्यास, निखिल व्यास, डॉ. भावना ( सलामे ) कुळसंगे तसेच परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.