सहसंपादक //उपक्षम रामटेके 📱9890940507
चंद्रपूर ६ जुलै – प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ३५१७ लाभार्थ्यांनी घेतला आहे. यातील ७५२ लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये २० हजार रुपये कर्जाचा लाभ घेतला असुन ४५ लाभार्थ्यांना ५०,००० रुपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका येथे यासंदर्भात आढावा बैठक आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली खाली ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली होती. मनपाच्या वतीने स्वनिधी से समृद्धी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता महानगरपालिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सभा घेण्यात येऊन पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
स्वनिधी से समृद्धी योजने अंतर्गत कर्ज घेतलेल्या पथविक्रेत्यांना शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, इमारत व इतर बांधकाम नोंदणीकरण, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, एक राष्ट्र एक राशन कार्ड, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना या सर्व योजनांचा लाभ मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण झालेल्या व्यक्तींना मिळणार आहे.
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते. चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे. या प्रसंगी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत धोंगळे, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, कामगार विभाग अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडीया मुख्य प्रबंधक पंकज चिखले, शहर अभियान व्यवस्थापक रफीक शेख, रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम, खडसे, लोणारे, मुन, करमरकर उपस्थीत होते.