जिवती : जिवती तालुक्यातील मौजा: सेवादासनगर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रा.पं.नोकेवाडा येथील सरपंच सौ.विमल राठोड हया अनेक दिवसापासून सतत प्रयत्न करीत असून, त्यांनी आरोग्य उपकेंद्र मंजूरीसाठी पंचायत समिती जिवती, जिल्हा परिषद, चंद्रपूर कडे तसेच जिल्हा परिषदचे तत्कालिन अध्यक्ष श्री.देवराव भोंगळे, जिवती पं.स.चे तत्कालिन उपसभापती महेश देवकते यांचेकडे पाठपुरावा करुन मागणी केली.
जिवती पं.स.चे माजी उपसभापती महेश देवकते यांनी मौजा: सेवादासनगर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर व्हावे, यासाठी मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंञी, महाराष्ट्र राज्य यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली. त्यावरुन पालकमंञी मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन व विकास परिषद बैठकीत मौजा: सेवादासनगर येथे *’विशेष बाब’* म्हणून आरोग्य उपकेंद्र मंजूरीच्या ठरावास मंजूरी दिली तसेच मा.ना.श्री.तानाजी सावंत, आरोग्य मंञी, महाराष्ट्र राज्य यांना पञ पाठवून सदर बाब निदर्शनास आणून दिली.
मौजा: भारी, सेवादासनगर तसेच दोनही गावालगत असलेल्या परिसरातील गावातील वाढती लोकसंख्या, तसेच गावापासून 15-20 कि.मी. असलेल्या जिवती आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रुग्णांना होणारा ञास कमी व्हावा यासाठी भारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व सेवादासनगर येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर होणे अत्यावश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन, महेश देवकते यांनी मुंबई येथे जाऊन, डॉ.सौ.शोभना तेहरा , सहसंचालक, आरोग्य सेवा (प्राथमिक आरोग्य केंद्र/जिल्हा परिषद स्तर), मुंबई यांना भेटून, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचेकडून आलेल्या मौजा: भारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व मौजा: सेवादासनगर येथे आरोग्य उपकेंद्र च्या *प्राप्त* प्रस्तावास त्वरित मंजूरी देण्यात यावी, यासाठी स्वतः निवेदन दिले आहे.
ग्रामीण भागातील वैद्यकिय सुविधांच्या प्रश्नांबाबत सहसंचालक यांनी तातडीने निर्णय घेऊ तसेच सदर प्रस्ताव संबंधित मंञालयात त्वरित पाठवू असे भेटीत कळविले आहे.
वरील दोनही गावात दवाखाने मंजूर झाल्यास; रुग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळेल व 15-20 कि.मी. जिवती येथे जाण्याचा ञासही वाचेल.