आज २१ जून, आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला. २१ जून हा दिवस जगातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त होते म्हणून हाच दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघाच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, चीन, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनीधी आहेत. याप्रस्तावावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दीनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. भारतीय प्राचीन संस्कृतीत योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन काळापासून भारतातल्या साधुसंत, ऋषीमुनींनी योगाचे महत्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिली आहे. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो ; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. भारतातील योगाची संस्कृती जागतिक पातळीवर स्वीकारली गेली आहे. जगभरातील देशांनी योग केवळ स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला आहे. कोरोनारुपी महामारीच्या काळात तर योग दिनाला विशेष महत्व प्राप्त झाले होते. कोरोना सारख्या महामारीचा मुकाबला करायचा असेल तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. नियमित व्यायाम आणि योगासन यांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. योग कसा करावा, कोणती योगासने मनाला आणि शरीराला सक्षम ठेवू शकतात यावर अभ्यासकांनी मते मांडली आहेत त्याप्रमाणे दररोज योग साधना करणे गरजेचे आहे. आज योग दिनानिमित्त एक दिवस योग करून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून या दिनाचा इव्हेंट न करता सर्वांनी योगाचा अंगीकार करून नियमित सराव करावा. जगाने योगाला राजमान्यता दिली आहे आपणही नियमित सराव ठेवून योगसाधना केली तरच आजच्या योग दिनाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५