🔹जुनचा शेवटचा हफ्ता बाकी असताना सुद्धा मोसमी पावसाचे आगमन नाही
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 19 जून):- हिंदू पंचांगानुसार युगानुयुगांपासून सामान्यतः 7 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असे मानले जाते.पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा ‘मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. भारतात 7 जूनपासून पावसाळा सुरू होतो आणि शेतकरी वर्ग आपल्या शेतीच्या कामाला लागतो. परंतु जुनचा शेवटचा हफ्ता बाकी असताना सुद्धा मोसमी पावसाला अजूनही सुरुवात झाली नाही त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, हंगामाचा
नावही शेतकऱ्यांच्या तोंडी येत नाही आहे, हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
पाऊस जसजसा लांबणीवर पडत आहे. तसतशी बळीराजाची चिंता वाढत आहे. या परिसरात प्रामुख्याने भात, उडीद, इतर कडधान्य असे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिके घेतली जातात. पाऊस लांबल्याने या पिकांना मोठा फटका बसत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे वीजपंप आणि पाण्याची सोय आहे त्यांनी वीजपंपाच्या मदतीने पाणी भरून भात लावणी केली तरीदेखील पीक जगेल की नाही याबाबत साशंकताच आहे. वीज केव्हा जाईल याचा नेम नाहीच नाही परंतु लोडसीडींगनी तर शेतकऱ्यांची झोपच उडवली आहे.तहानलेला बळीराजा मेघराजाच्या प्रतीक्षेत असतांना किती दिवस शेतकऱ्यांना पाऊसाची प्रतीक्षा करावी लागेल हे आता निसर्गच जाणे.
———————————————
पाऊस नाही पडला तर, आमच्या पिकांची नुकसान होईल. आणि आर्थिक परिस्थितीला समोर जावं लागेल, आमची व्यथा कुणाला सांगणार निसर्गाला तर आम्ही रोज हात जोडतो आम्हाला चांगला पाऊस दे आणि आम्हाला जगव – शेतकरी वर्ग