लहानपण देगा देवा l
मुंगी साखरेचा रवा ll
ऐरावत रत्न थोर l
त्यासी अंकुशाचा मार ll
संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील या प्रसिद्ध ओळी. संत तुकाराम महाराज म्हणतात की लहानशा मुंगीला साखरेचा आणि रव्याचा खाऊ खायला मिळते. मुंगी लहान जीव असूनसुध्दा सुखाने जीवन जगत असते.त्याउलट ऐरावत म्हणजे हत्ती, शरीराने एवढा मोठा राहूनही त्यास माहुताकडून अंकुशाचा मार खावा लागतो. म्हणजेच लहानपणातील जीवन किती सुखी आणि मस्तीचे असते, हे या ओळीतून अधोरेखित होते.
संत तुकारामांच्या या ओळी आठवल्या की परत आपल्याला एकदा बालपणात जावेसे वाटते. बालपण म्हटले की मजाच मजा. कोणते काम नाही, कोणती जबादारी नाही. हिंडणे, फिरणे, बागडणे, इकडे तिकडे उड्या मारणे, मित्रासोबत मस्त खेळणे एवढेच काम. आमच्या लहानपणी विटी दांडू खेळणे, गोळ्या खेळणे, आंबु- टीम्बु, सई-डाई, लपन छुपण, क्रिकेट, असे कितीतरी खेळ खेळत रहायचे. जोपर्यंत आई किंवा बाबाची हाक कानावर येत नाही किंवा पाठीवर रट्टे पडत नसत तोपर्यंत घरी कोणी जात नसत. एवढे खेळण्यात मग्न असायचे. रविवारी सुट्टीच्या दिवशी नदीवर अंघोळ करायला जाणे, आंब्याच्या आमराईत आंबे पाडायला जाणे तर कधी बंदरांना पिटाळत असायचे. असे कितीतरी खेळ आम्ही लहानपणी खेळायचे.
आता काळ बदलला आहे. सारेच जण आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत. लहान मुले सुद्धा एकमेकास भेटत नाही. सर्व अभ्यासात मग्न झाले आहेत.डोरेमॉनच्या गॅझेट पेक्षा भयंकर गॅझेट मुलांच्या हातात पडले. तेंव्हा पासून मुले घराच्या बाहेर जाऊन मैदानावर खेळण्याचे विसरले आहेत. मुलांचे दूध सुटण्याअगोदर त्याच्या हातात मोबाईल दिले जाते. मोबाईल ते तेव्हापासूनच हाताळायला लागते. मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ, व्हिडिओ गेम हेच मुलांचे विश्व बनले आहे. आज मुलांचे बालपण मोबाईल मध्ये हरवले आहे. ना त्यांना घराबाहेर पडायला आवडत, ना मित्रासोबत खेळायला. आपल्याच विश्वात मग्न असल्याने बालमनावर विपरीत परिणाम होत आहे.
मुलांमध्ये एकटेपणा वाढला आहे, डोळ्यावर दुष्परिणाम होत आहे . शारीरिक काम नसल्याने स्थूलपणा, लठठपणा वाढत आहे. याला जबाबदार मुलापेक्षा त्यांचे पालक जास्त जबाबदार आहेत. मुलं थोडं रडू लागले की त्यांच्या हातात मोबाईल देतात. मुलं थोडं हट्ट केला तरी मोबाईल देतात. त्यामूळे या सवयीचे व्यसनात रूपांतर झाले आहे. मुलांना मोबाईल मधून बाहेर काढायचे असेल तर प्रथम पालकांना मुलासारखे लहान बनावे लागेल.त्यांच्या सोबत खेळ खेळावे लागतील. तरच मुले पुन्हा एकदा मोबाईल मधून बाहेर पडून खेळायला लागतील.
✒️जितेंद्र रायपुरे(गडचिरोली)मो:-8806550920