🔸रमेश बाविस्करांची विश्वकर्मा सांस्कृतिक भवनासाठी ५१००० रुपयांची देणगी
✒️प्रतिनिधी धरणगाव(पी.डी.पाटील)
जळगांव(दि.16जून): – सेंट्रल रेल्वे मुंबई येथून चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेले रमेश बाविस्कर ( वाकळीकर,ता. जामनेर ) यांचा सत्कार श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव तर्फे विश्वकर्मा भवन येथे दिनांक १४ जुन २०२३ रोजी मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.बाविस्कर हे माटुंगा रेल्वे वर्कशॉप ( मुंबई ) येथून सी.एफ.वन विभागातून सिनियर टेक्निशियन म्हणून मे २०२३ अखेर निवृत्त झाले. सेवानिवृत्ती कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सौ.अनिता बाविस्कर,मंडळाचे सचिव एम.टी.लुले, उपाध्यक्ष निलेश सोनवणे, खजिनदार मनोहर लुले, सल्लागार गोपाळ रूले, सदस्य संजय जाधव व भागवत रुले, भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे मान्यवर उपस्थित होते.
श्री विश्वकर्मामय पांचाळ सहायक मंडळ जळगाव तर्फे रमेश बाविस्कर यांना शाल व बुके देऊन अध्यक्ष अरुण जाधव आणि सचिव एम.टी.लुले यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.सत्कारार्थी बाविस्कर यांच्या सन्मानार्थ एम.टी.लुले म्हणाले की,’ निवृत्ती नंतर केलेली समाजसेवा मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
कर्तव्यदक्षता,वक्तशीरपणा,प्रामाणिकता आणि सौजन्यशीलता यागुणांमुळे बाविस्करांनी सेवाकाळात सर्वांची मने जिंकली.’ भागवत रुले यांनीही गौरवपर मनोगत व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना रमेश बाविस्कर म्हणाले की,’ गरीबीची चटके,हितचिंतकांनी केलेले मार्गदर्शन आणि पत्नीने प्रतिकूल परिस्थितीत दिलेली समर्थ साथ यामुळे माझ्या जीवनात सार्थकता व आत्मसमाधान आहे.माझ्या मुलांनी योग्य शिक्षण घेऊन आम्ही दिलेल्या संस्कारांनी ते आनंदी व निर्व्यसनी जीवन जगताहेत हा माझ्या जीवनातला परमोच्च आनंद आहे.
वस्तीगृह व श्री विश्वकर्मा सांस्कृतिक भवनाच्या नुतनीकरणाच्या कामाबद्दल त्यांनी पदाधिकार्यांचे कौतुक केले आणि उत्स्फुर्तपणे ५१००० हजार रुपयांची देणगी बांधकामासाठी जाहिर केली.धनराशीचा चेक बाविस्कर यांनी धर्मपत्नी अनिता बाविस्कर उभयतांनी मंडळाध्यक्ष जाधव व सचिव लुले यांना विनम्रपणे सुपूर्द केला आणि मंडळाच्या उत्कर्षासाठी शुभेच्छा दिल्या. प्रस्तावना व आभार प्रदर्शन मंडळाचे सदस्य भागवत रुले यांनी केले.