मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 मध्ये राज्य निधी व आशियाई विकास बँक अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती व सुधारणा करण्यासाठी 29 कोटी निधीची मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या अथक प्रयत्नांतून यापूर्वीही राज्य शासनाच्या विविध विकासाभिमुख योजनांतून मोर्शी वरूड तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा आणि बांधणीसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि पायाभूत विकासासाठी केंद्रस्थानी असणाऱ्या रस्ते विकासासाठी आमदार देवेंद्र भुयार हे नेहमीच प्रयत्नशील असतात. आ. भुयार यांच्या रस्ते विकास अनुषंगाने विकासाभिमुख दूरदृष्टीतील कार्यात्मक भूमिकेमुळे सध्या वाहतूक रहदारीसाठी येत असलेले अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. मोर्शी वरूड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी सदर रस्ते मंजूर करण्याची मागणी करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आमदार देवेंद्र भुयार यांच्या या मागणीवरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना निधीतून सदर निधी मंजूर झाला आहे.
याबाबत सविस्तर माहीती देताना आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले की, मोर्शी मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा व दर्जोन्नती करणेसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा – 2 आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत ५ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून मतदारसंघातील २४.२५ कि.मी. लांबीच्या रस्त्याची १९ कोटी ६१ लाख २४ हजार रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांची सुधारणा होणार आहे. सदर रस्त्यांच्या कामाची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहेत. या रस्त्याच्या कामामुळे विविध गावांना मुख्य रस्त्यांना जोडली जाणार असल्याने दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.
मोर्शी मतदारसंघातील मोर्शी तालुक्यातील ग्राीमीण भागातील निंभी ते पिंपळखुटा या ५ कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ४ कोटी ३३ लाख ५६ हजार रुपये निधीची तसेच त्याच्या नियमित देखभालीसाठी ३० लाख ३५ हजार रुपये, खानापूर ते येरला या ५.१७० कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ८२ लाख १९ हजार रुपये निधीची तसेच त्याच्या नियमित देखभालीसाठी २६ लाख ६९ हजार रुपये, निधीची तरतूद करण्यात आहे.
वरूड तालुक्यातील पुसला ते चांदस रस्ता या ७.५८० कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ६ कोटी ५२ लाख ५६ हजार रुपये निधीची तसेच त्याच्या नियमित देखभालीसाठी ४५ लाख ६८ हजार रुपये, राजुरा ते वावरुळी रस्ता या ४.३०० कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ५ लाख १८ हजार रुपये निधीची तसेच त्याच्या नियमित देखभालीसाठी २१ लाख ३६ हजार रुपये, राजुराबाजार ते मोरचुंद या २.२०० कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी १ कोटी ८७ लाख ७५ हजार रुपये निधीची तसेच त्याच्या नियमित देखभालीसाठी १३ लाख १७ हजार रुपये, निधीची तरतूद करण्यात आली असून अशी एकुण रस्त्यांच्या सुधारणा, दर्जोन्नती व देखभालीसाठी १९ कोटी ६१ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर झालेले आहेत. त्यामुळे सदर रस्त्यांची कामे करण्यात येणार असून मोर्शी वरूड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी निधी मंजूर करून दिल्या बद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे आभार मानले.