सर्वत्र महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून उत्पादन खर्चच वाढल्याने आणि उत्पादन खर्चावर आधारीत शेती उत्पादीत पिकांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले असुन उत्पादनाला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरीत आहे.
शेतकऱ्यांना शेती मशागती पासून खते, बियाणे, किटकनाशके, तणनाशके आर्दीवर प्रचंड खर्च करावा लागतो. वर्ष २००० मध्ये शेती कामासाठी मजुरीचा दर अत्यल्प होता. यामध्ये महिला ३० रुपये व पुरुषांना ४० रुपये मजुरी दर होता. त्याकाळी मजुर सुध्दा शेतामध्ये राब-राब राबत होते. आजच्या परिस्थितीत महिलांना १५० रुपये २०० रुपये तर पुरुषांना ३०० ते ४०० रुपये प्रति दिवसासाठी देवूनही कामे करण्यासाठी मजुर वर्ग टाळाटाळ करत असतो. शेतमालाचे भाव शेती उत्पादन खर्चावर आधारीत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपासह रब्बी व बागायत पिकांचे उत्पादन घेईपर्यंत निसर्गाची साथ मिळेलच असे नाही.
सध्या सोयाबिन, कापुस ही पिक नगदी समजल्या जात असली तरी सोयाबीनला भाव ५ हजार तर कापसाला सात-आठ हजारापर्यंत प्रति क्विंटल मिळत असल्यामुळे उत्पादन खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ बसणे अवघड बाब बनली आहे. बाजारामध्ये शेती उत्पादीत मालाला जास्त भाव मिळणारच या अपेक्षेने शेतकरी शेती पिकांवर भरमसाठ खर्च करतात. शेतक-याला उत्पादन खर्चानुसार शेतीमालाचा दर मिळत नाही. शासनाचे धोरण व्यापारी धार्जिणे व ग्राहकाच्या हिताचे असल्यामुळे शेतकऱ्याचे नेहमीच नुकसान होत आहे. कापूस प्रक्रियेत सुध्दा कारखानदार, निर्यातदार व व्यापाऱ्यांना फायदा होतो. कापडाची दर वाढतात मग कापूस दर कमी होण्याची कारणे समजत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची अर्थव्यवस्था प्रतिवर्षी ढासळत चालली आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी बनत आहे. किटकनाशके, तणनाशके, खते, बियाणे, अवजारे आदी शेती उपयोगी साहित्य यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यासोबत शेती उत्पादनाचा वाहतुक खर्च, मजुरीचे दर आणि वाढीव मजुरी देवूनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सर्व शेती उत्पादनाच्या खर्चामध्ये ४० ते ५० टक्के वाढ झाली. परंतु शेती उत्पादीत शेतमालास बाजारपेठेत भाव वाढ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळत असून मालाला योग्य भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
अलिकडे शेतकऱ्यांना निसर्गाची साथ मिळत नाही. कोणतेही शासन असो, शासनाकडुन शेतकऱ्यांना नेहमीच हिणवल्या जाते. सोबतच शेती उत्पादनासाठी लागणान्या सर्व साहित्याचे गगनाला भिडलेले भाव, मजुर टंचाई, वाहतुकीचा खर्च, बाजारपेठेत शेती उत्पादनाला मिळणारा कमी दर आणि शासनाचे व्यापारी धोरण यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असुन उत्पादनाला हमी भाव मिळावा अशी मागणी शेतकन्यांतून होत आहे.
सुरेश डांगे, संपादक साप्ताहिक पुरोगामी संदेश मो. नं. ८६०५५९२८३०