Home महाराष्ट्र वेणूताईंनी विठामाता व यशवंतराव यांचा आदर्श व संस्कार जपला-प्रा. डी. ए. माने

वेणूताईंनी विठामाता व यशवंतराव यांचा आदर्श व संस्कार जपला-प्रा. डी. ए. माने

57

कराड (दि. 1 जून, 23) ‘वेणूताई चव्हाण संस्कारक्षम मनाच्या संवेदनशील व्यक्ती होत्या, त्यांनी माहेर व सासरच्या संस्कारांचे जतन करून फक्त यशवंतरावांच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला आकार देण्याचे महनीय कार्य केले. माणूस व माणूसपणाची प्राणांतिक तळमळ असणाऱ्या वेणूताईंसारखी माणसे आज दुर्मिळ होत आहेत, हा सामाजिक चिंता व चिंतनाचा विषय आहे. खऱ्या अर्थाने वेणूताईंनी विठामाता व यशवंतराव यांचा आदर्श व संस्कार जपला.” असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजना, तासगावचे चेअरमन मा. प्रा. डी.ए. माने यांनी केले. ते वेणुताई चव्हाण कॉलेज कराड येथे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेणूताई चव्हाण यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या समारंभाचे अध्यक्षपद श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे जनरल सेक्रेटरी, मा. श्री अल्ताफहुसेन मुल्ला साहेब यांनी भूषविले. ते आपल्या मनोगतात म्हणाले, ‘विठामातांनी यशवंतरावांची जडणघडण ज्या सुज्ञ व सुजाणपणे केली, त्याच समंजसपणे वेणूताईंनी यशवंतरावांचा संसार केला. वेणूताई भारतीय कुटुंब व्यवस्थेचा आदर्श आहेत.’
या समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री अरुण पाटील (काका), मा. श्री प्रकाश पाटील (बापू), मा. श्री दिलीपभाऊ चव्हाण, मा. प्राचार्य डॉ. आर. ए. केंगार, डॉ. हणमंत कराळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस. आर. सरोदे यांनी करून दिला. जूनियर विभागाचे उपप्राचार्य श्री आर. ए. कांबळे यांनी समारंभास उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी यांचे आभार व्यक्त केले. प्रा. श्रीमती एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सदर समारंभास दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनीं बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here