Home Breaking News प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड : चार आण्याची कोंबडी आटाण्याचा मसाला

प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड : चार आण्याची कोंबडी आटाण्याचा मसाला

68

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी) :-
तुम्हाला काही समजते की नाही? एसी मध्ये बसून फक्त कागदी घोडे नाचवता काय? तुम्ही इथे प्रत्यक्ष भेट दिली आहे का? तुमचा कसलाही कारभार मी खपवून घेणार नाही? नियमात राहा. नियमाने काम करा. उंटावरून शेळ्या हाकणे बंद करा? नाही तर घरी बसा, अशा शब्दात संतापलेल्या आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मृद व जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही, असाही इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत पालम तालुक्यातील मौजे.लांडकवाडी येथील तलावातील गाळ काढणे कार्यक्रमाचा शुभारंभ गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्याचे नियोजित होते. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, विभागीय जलसंधारण अधिकारी अशोक भनगिरे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी गजानन डुकरे यांच्यासह आ.डॉ.गुट्टे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहिले. परंतु कामाची व्याप्ती अतिशय छोटी आणि अंदाजपत्रक तब्बल २६ लाख रूपयांचे हि विसंगती पाहून आ.डॉ.गुट्टे संतापले आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी आपण परवाच पदभार स्विकारल्याचे स्पष्टीकरण विभागीय जलसंधारण अधिकारी अशोक भनगिरे यांनी दिले.
आ.डॉ.गुट्टे यांच्या आक्रमक शाब्दिक हल्ल्यामुळे गलितगात्र झालेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यांने तलावास प्रत्यक्ष भेट न देताच कार्यालयात बसून सदरील अंदाजपत्रक तयार केल्याचे मान्य केले. तसेच भविष्यात अशी चूक होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर आ.डॉ.गुट्टे यांनी शांतपणे काही सूचना केल्या. तसेच तुम्ही त्या सूचनेवरून काम केले आहे की नाही? हे पाहायला मी स्वतः येणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. हा सगळा प्रकार अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या समोर घडल्याने त्यांनी झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना दिले आहेत.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव गळाकाटू, तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, युवक तालुकाध्यक्ष बालासाहेब लटपटे, रासप तालुका अध्यक्ष शेषराव सलगर, गोविंदराव डोणे, बालासाहेब गुट्टे, आकाश राठोड यांच्यासह कार्यकारी अभियंता तसेच राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
दरम्यान, मागेही एकदा पालम तालुक्यातील शाळेच्या इमारतीचे निकृष्ट बांधकाम आढळल्याने लोकार्पण न करताच आ.डॉ.गुट्टे परतले होते. त्यांची जिल्हाभर चर्चा रंगली होती. आताही तोच कित्ता गिरवत आ.डॉ.गुट्टे शुभारंभ न करताच परतल्याने शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची सोशल माध्यमासह सर्वत्र चर्चा होत आहे.
प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
सरकारी कामात अनियमितता हे काही नवीन नाही. परंतु एखाद्या कामाचे अंदाजपत्रक ‘अंदाजे’ तयार होण्याची हि दुर्मिळ घटना आहे. काम आणि खर्च याचा मेळ बसत नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एक ते दोन लाखांच्या कामाची रक्कम थेट २६ लाख रूपये केल्याने ‘चार आण्याची कोंबडी अन् आटाण्याचा मसाला’ अशी गत मृद व जलसंधारण विभागाची झाली आहे.
‘ते’ आले, ‘त्यांनी’ पाहिले आणि ‘ते’ परतले…
अगदी सकाळच्या प्रसन्न वातावरणात कामाचा शुभारंभ करण्यासाठी आ.डॉ.गुट्टे येत असल्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, पदधिकारी व कार्यकर्ते यांची गर्दी झाली होती. मात्र, कार्यक्रम स्थळी घडलेला प्रकार आणि आ.डॉ.गुट्टे यांची आक्रमकता पाहून ‘ते’ आले, ‘त्यांनी’ पाहिले आणि ‘ते’ परतले, असे वर्णन उपस्थितांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here