मोर्शी तालुका प्रतिनिधी /
विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी आदर्श शाळा कशी असावी असा प्रश्न पडल्यास अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषद शाळा हे उत्तम उदाहरण ठरेल.
या शाळेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यतिरिक्त वेळेतही शिक्षणाचे धडे दिले जातात. अल्पकालावधीतच शिक्षक व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नाने या शाळेचा कायापालट झाला. त्यातूनच इंग्रजी माध्यमाच्या संस्कृतीकडे वळणारी पावले दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागली आणि या शाळेवर ‘वाढीव पटसंख्येचा फलक झळकला.
शिक्षनाच्या खालावलेल्या दर्जातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिका, नगर पालिकांच्या शाळा कालबाह्य़ होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेची संस्कृती मोडकळीस निघत आहे. याला काही अपवादही आहेत. असाच अपवाद ठरली आहे अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषदेची शाळा.
तीन हजार लोकसंख्या असलेल्या दापोरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची शाळा आहे. काही वर्षांपूर्वी या जिल्हा परिषद शाळेचीही इतर शासकीय शाळेप्रमाणाचे दयनीय अवस्था सुरू होती. त्यामुळे गावातील बहुतांश पालक आपले पाल्य गावापासून दूरवर शहरातील शाळेत पाठवत होते. गावाच्या आणि शाळेच्या सुदैवाने गावकरी, मुख्याध्यापक शिक्षक यानिमित्ताने एकत्र आले. त्यासाठी त्यांनी स्वत: जवळील पैसे गोळा केले. शिक्षकांच्या या विधायक कार्याला गावकऱ्यांनीही एकदिलाने साथ दिली व या कार्यात शिक्षकांनी अनमोल वाटा उचलला. त्या माध्यमातून शाळेचा कायापालट करण्यात आला. शाळेची रंगरंगोटी, भिंतीवरील बोलकी चित्र प्रदर्शनी विध्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे शिकवितांना दिसत आहे, शाळेमध्ये सर्व वर्ग खोल्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे, डिजिटल क्लास रूम, विद्यार्थी सहकारी बचत बँक, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल प्रयोगशाळा, कॉन्व्हेन्ट सुविधा, विविध रंगांची फुलझाडे, शाळेतील विध्यार्थ्यांना सर्व खेळाच्या सेवा सुविधा, संपूर्ण शाळा रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा, मुलभूत सोयीसुविधा करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त अशा अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. भौतिक सुविधांची व्यवस्था झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लक्ष केंद्रित करण्यात आले. मागील वर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा आपला ठसा उमटवीला असून मागील वर्षी जिल्हा क्रीडा सर्धेमध्ये विविध खेळांमध्ये मेडल प्राप्त करून खोखो, कबड्डी , कुस्ती, यासारख्या खेडामध्ये येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे यासाठी शाळेतील शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेसाठी देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे अनमोल कार्य करताांना दिसत आहे .
या शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता श्रम संस्कार शिबिर, उन्हाळी छंद शिबिर,यासरखे वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून शिक्षणाचे धडे दिले जातात.
या शाळेत कॉन्व्हेन्ट, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेची नावलौकिकता वाढल्यामुळे आता पटसंख्या ही तब्बल २१० च्या पुढे गेली आहे. मोर्शी तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये असा उपक्रम राबविल्यास एखाद्या नामांकित खासगी शाळेप्रमाणे या जिल्हा परिषद शाळेवर देखील ‘हाऊसफुल्ल’चा फलक लावल्या जाऊ शकतो. शिक्षकांचे परिश्रम आणि त्याला गावकऱ्यांची साथ मिळाल्यामुळे या शाळेच रूपडं पालटलं असल्याचे दिसत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, व गावकऱ्यांनी शाळेत व्यापक परिवर्तन आणण्याचा निर्धार करून शिक्षकांनी व गावकऱ्यांनी स्वत: मेहनत घेऊन दापोरी जिल्हा परिषद शाळेला एक नव रूप दिलं.
शासनाने राज्यातील शाळांमध्ये दापोरी ‘पॅटर्न’ राबवावा !
दापोरी येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाने करायला हवा. दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अनोखे उपक्रम राबविल्याने शाळेत आवश्यक त्या सर्व भौतिक सोई सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थी आनंदाने हसत खेळत शिक्षण घेतांना दिसतात. दापोरी येथील जिल्हा परीषद शाळेचा हा उपक्रम जिल्हय़ातील अन्य जिल्हा परिषद शाळांनी राबविल्यास जिल्हा परिषद शाळांवर पालकांचा विश्वास बसेल अशी अपेक्षा आहे. — रुपेश वाळके, ग्राम पंचायत सदस्य.
गावकऱ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत शाळेत परिवर्तन घडवण्याला सुरुवात केली. याला गावकऱ्यांची अनमोल साथ मिळाली, त्यामुळे हे शक्य झाले. शाळेतील विद्यार्थ्यांना हसत खेळत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वसुविधा पुरवण्याचा आम्ही सर्व शिक्षक व गावकरी प्रयत्न करीत आहे. — गजानन चौधरी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा दापोरी.