Home Breaking News इम्रान यांना खलनायक करण्याचा लष्कराचा प्रयत्न फसला

इम्रान यांना खलनायक करण्याचा लष्कराचा प्रयत्न फसला

67

पाकिस्तानमध्ये सध्या अभूतपूर्व परिस्थिती आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यावर पाकिस्तानमध्ये हिंसेचा आगडोंब उठला होता. लोक रस्त्यावर उतरून जाळपोळ करत होते. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान यांना जामीन मंजूर केला. जर इम्रान खान यांना अटक झाली तर देशात दंगली घडतील हे देखील या जामीनामागचे महत्वाचे कारण होते. इम्रान यांना जामीन मंजूर झालेला पाकिस्तानी लष्कराला रुचला नाही काहीही करून इम्रान यांना अटक करायचेच असा चंगच पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानच्या विद्यमान सरकारने बांधला होता त्यासाठी त्यांनी इम्रान यांच्या घरात ३०० दहशतवादी घुसले असल्याची आवई उठवली आणि इम्रान यांच्या घरात प्रवेश केला मात्र त्यांच्या घरात त्यांना एकही दहशतवादी सापडला नाही इम्रान यांना खलनायक ठरवण्याचा लष्कराचा प्रयत्न फोल ठरला. या सर्व घडामोडीत इम्रान खलनायक नाही तर नायक ठरले. लोकांची सहानुभूती इम्रान यांना मिळाली. आज इम्रान पाकिस्तानमधले सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले. लष्कर जाणीवपूर्वक इम्रान यांना खोट्या आरोपाखाली अटक करत आहे याची खात्री लोकांना पटली असून पाकिस्तानी लोक आता लष्कराला शिव्या घालत असून इम्रान यांना दुवा देत आहेत. इम्रान यांची लोकप्रियता आधीच होती. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार या नात्याने त्यांनी पाकिस्तानला विश्वकप जिंकून दिल्यापासून ते पाकिस्तानचे सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती ठरले होते मात्र मधल्या काळात त्यांच्या या लोकप्रियतेला ओहोटी लागली होती. पंतप्रधान म्हणून त्याची कामगिरी साधरणच होती त्यांच्या पंतप्रधान काळात देशातील महागाईने उच्चांक गाठला होता त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज होती मात्र लष्कराने त्यांना पंतप्रधानपदावरून हटवले आणि त्यांना अटक करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मधल्या काळात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला देखील झाला होता या सर्व घडामोडीत इम्रान यांना लोकांची सहानुभूती मिळाली आणि आज ते पुन्हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. इम्रान यांना अटक करण्यात ज्या लष्कराने पुढाकार घेतला होता त्यांच्याविषयी मात्र पाकिस्तानी जनतेत कमालीचा संताप निर्माण झाला असून सध्याच्या लष्करप्रमुखास लोक शिव्या घालत आहेत इतकेच काय तर इम्रान यांना अटक करण्यासाठी सध्याच्या लष्करप्रमुखांनी जी खेळी केली ती लष्करातीलच एका गटाला रुचली नाही कारण इम्रान हे पठाण आहेत आणि पाकिस्तानी लष्करात पठाण समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इम्रान यांना अटक करण्यावरून पाकिस्तानी लष्करातच दुफळी पडली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्कर यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते असते हे आपण जाणतोच. जो पंतप्रधान लष्कराचे ऐकत नाही त्याला पदच्युत केले जाते. १९७७ साली पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो हे देखील लष्कराला जुमानत नव्हते त्यामुळे त्यावेळचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जिया उल हक यांनी त्यांना अटक करून तुरुंगात डांबले होते नंतर आणि स्वतः पाकिस्तानचे अध्यक्ष बनले होते. १९९९ साली देखील पाकिस्तानला जेंव्हा कारगिल युद्धात हार स्वीकारावी लागली होती तेंव्हा त्यावेळचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनीही नवाज शरीफ यांना अटक करून लंडनला पाठवले व स्वतः सत्ताधीश बनले होते .आताच्या पंतप्रधानांचाही तोच डाव होता अर्थात याला सध्याचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची फूस होतीच मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने त्यांचा हा डाव मोडला आणि इम्रान यांची अटक होता होता वाचली. या सर्व घडामोडीत इम्रान यांना मात्र जनतेची सहानुभूती मिळाली आणि त्यांची कमी झालेली लोकप्रियता पुन्हा वाढली. मात्र पाकिस्तानचे लष्कर यामुळे शांत बसेल असे वाटत नाही. ते इम्रान यांच्या विरोधात कट कारस्थान करतच राहील कदाचित त्यांना पुन्हा अटक करण्याची किंवा त्यांना परदेशात पाठवण्याची योजना लष्कराकडून आखली जाऊ शकते त्यामुळे इम्रान नाट्याचा पहिला अंक संपला असला तरी दुसऱ्या अंकास लवकरच सुरवात होईल हे नक्की.

श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here