गंगाखेड (प्रतिनिधी-अनिल साळवे)
गंगाखेड – धनादेश अनादर केल्याबद्दल गंगाखेड शुगर विरूद्ध मारोती सुरनर प्रकरणी गंगाखेड न्यायालयाने फिर्यादीच्या बाजूने निकाल देऊन आरोपी मारोती सुरनर यांना तीन महिने कारावास व ४,३७,१७८ रूपये तीस दिवसांच्या आत गंगाखेड शुगरला देण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गंगाखेड शुगर एनर्जी लि. साखर कारखान्याने ऊसतोड वाहतूक कामासाठी मारोती सुरनर यांच्याशी लेखी करार केला होता. त्यानुसार कारखाना प्रशासनाने आरोपी मारोती सुरनर यांना काही रक्कम दिली होती. करार संपुष्टात आल्यानंतर झालेल्या हिशोबाने उर्वरित रक्कम आरोपीने गंगाखेड शुगर यांना वर्ग करणे अनिवार्य होते. परंतु तसे न झाल्याने गंगाखेड शुगरने वेळोवेळी आरोपीस समज, लेखी नोटीस दिली. मात्र, तरीही आरोपीने कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर गंगाखेड शुगरने न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी मारोती सुरनर यांना तीन महिने कारावास व ४,३७,१७८ रूपये तीस दिवसांच्या आत गंगाखेड शुगरला देण्याचे न्यायाधीश रूद्रभाटे यांच्या न्यायालयाने आदेश दिले आहेत. या प्रकरणी गंगाखेड शुगर तर्फे ॲड.सुनिल कांगणे व ॲड.मिलिंद क्षिरसागर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड.जितेंद्र सोनसळे यांनी सहकार्य केले.