Home महाराष्ट्र एक आदर्शवत विवाह सोहळा-प्रत्येकाने असा आदर्श जपावा

एक आदर्शवत विवाह सोहळा-प्रत्येकाने असा आदर्श जपावा

96

 

सुनील शिरपुरे/झरीजामणी

मानवी जीवनातील एक विधिवत सोपस्कार म्हणजे विवाह सोहळा. या विवाह सोहळ्याविषयी अनेक किस्से ऐकायला मिळतात. या किस्यातील काही किस्से प्रसिद्धीसाठी तर काही समाजाला एक आदर्श व प्रेरणा देण्याच्या माध्येमातून केल्या जाते. असाच काहिसा आदर्श व प्रेरणादायी विवाह सोहळा वणी येथे पार पडला. यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी तालुक्यातील मांगली (हिरापूर) येथील राजेश विमल दत्तात्रय मादेवार आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील बेला येथील दिपाली सुनिता प्रकाश बुरेवार यांचा विवाह सोहळा वणीतील बाजोरिया हॉलमध्ये अत्यंत आदर्शवत पद्धतीने संपन्न झाला. श्री. गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे सेवाधिकारी, कृतीशील सुधारक आणि ग्रामगीता अभ्यासक ज्ञानेश्वरदादा रक्षक नागपूर यांच्या संकल्पनेतून वराचे ज्येष्ठ बंधू संजय मादेवार यांच्या पुढाकाराने आणि मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते संजय गोडे यांच्या सहकार्याने अतिशय आनंदात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती. लग्नपत्रिकेत कुठेही मुहूर्ताचा उल्लेख नाही. ग्रामगीतेतील वैवाहिक संस्कार या अध्यायातील ओव्यांचा समावेश त्यात होता. राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करून विवाह संस्कारास सुरुवात करण्यात आली. वरवधूंचा परिचय करून देण्यात आला. लग्न अगदी वेळेवर लागले. राजेश हे PSI पदावर असून धंतोली नागपूर येथे कार्यरत आहे. तर दिपाली यांचे B.Sc.DMLT झालेले आहे. वरवधूच्या आईवडिलांनी परस्परांचे ग्रामगीता व पुष्प देऊन स्वागत केले. ज्ञानेश्वरदादा रक्षक यांचे उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन मिळाले. ” लग्न हे मनोरंजनाचे साधन नसून तो एक संस्कार आहे. तो विधिवत पार पडावा, त्यातून समाजाने आदर्श घ्यावा” असे ते यावेळी म्हणाले. लग्नात वरवधूच्या मध्ये अंतरपाट न धरता दोघेही सर्वांना दिसतील, असे उभे होते.

 

धान्याच्या अक्षता टाळून केवळ फुलांचा वर्षाव करण्यात आला. राष्ट्रसंतांनी लिहिलेली मंगलाष्टके अतिशय मधूर आणि भारदस्त आवाजात बाळकृष्णदादा पाचभाई यांनी गायनाच्या स्वरुपात म्हटले. वरवधूचा शपथविधी संपन्न झाला. त्यानंतर, वधू सौ. दिपालीताई यांची ग्रंथतुला करण्यात आली. एका पारड्यात वधू आणि दुस-यात भारतीय संविधान, ग्रामगीता, बालशिक्षण, अभ्यास कसा करावा अशी अनेक परिवर्तनवादी पुस्तके होती. सदर पुस्तके परिसरातील शाळा व वाचनालये यांना भेट देण्यात येतील. अग्निसंस्कार आणि शांतीपाठ झाल्यावर शेवटी सामूहिक राष्ट्रवंदना झाली आणि हा विवाह सोहळा यथासांग पूर्ण झाला. या विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची संधी ज्ञानेश्वरदादा रक्षक, नागपूर यांना दिल्याबद्दल दोन्ही परिवाराचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. नवदाम्पत्य राजेश आणि दिपाली यांचे व कुटुंबियांचे खूप अभिनंदन! ज्यांनी हा सोहळा अभिनव व दिशादर्शक पद्धतीने साजरा करण्यासाठी पावलं उचलली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here