✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड/ढाणकी (दि. 6 मे) जगाला शांती,अहिंसा, समता प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त 5 मे रोजी सायंकाळी सात वाजता ढाणकी कॅन्डल मार्च रॅली काढून उच्चा तो आनंदमय वातावरणात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तथागत भगवान बुद्ध नगर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ बुद्ध विहार येथे बुद्ध जयंती निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बुद्ध जयंती निमित्त सकाळी दहा वाजता महा बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने उपासक आणि उपासीका यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
दिवसभर ढाणकी येथील विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तथा नागरिकांची तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करण्यासाठी तथागत भगवान बुद्ध नगर येथील बुद्ध विहारात हजेरी लावली होती.
सायंकाळी 7 वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव भगिनी आणि बाल बालिका हातात मेणबत्ती घेऊन मेणबत्ती रॅलीमध्ये सहभागी झाले.
बुद्ध विहारा पासून निघालेली मेणबत्ती रॅली मध्ये “जगाला युद्ध नको बुद्ध हवा,” अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी तथागत भगवान बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा संदेश देण्यात आला.
संविधान चौकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
बुद्ध विहाराच्या प्रांगणात मेणबत्ती रॅलीचा त्रिशरण पंचशील ग्रहण करून समारोप करण्यात आला.
यावेळी उपस्थित नागरिकांना खीर आणि खिचडीचे वाटप करण्यात आले, ढाणकी येथील तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मेणबत्ती रॅली व विविध कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले होते.