Home महाराष्ट्र देव देवऱ्यात नाही, माणसात शोधावा-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

देव देवऱ्यात नाही, माणसात शोधावा-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

84

 

राष्ट्रभिमान म्हणुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन स्वत: खंजेरीच्या सहाय्याने भजन, किर्तन व प्रवचन करुन लोकांना बुवाबाजी, व्यसनमुक्ति, अंधश्रध्देपासुन सावध राहा अशी समय सुचकता देत असंत, समाज जागृत करीत होते. त्यांच्या खंजेरीने श्रोता अगदी मंत्रमुग्ध होऊन भारावून जात होता. ते म्हणत- “गावा गावासी जागवा, भेदभाव समुळमिटवा” उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकडया म्हणे ! मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशाने भेटायचा नाही रे ! अशी सुंदर-सुंदर पदे त्यांनी आपल्या कवनाने ऐकविली. ही पदे देखील हितोपदेश देणारी होती, मनाला भुरळ पाडणारी होती.
राष्ट्रसंत आपल्या भजनातून व कीर्तनातून जातीभेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारु पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत ते खेडोपाडी जाऊन त्या माध्यमातून लोकांना प्रवचनाद्वारे त्यांच्या मधले असलेले विकार दुर करायचे. प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरुस्मरण व अंधश्रध्दा, वाईट रुढी, व्यसने यांचा त्याग करा नाही तर गर्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही असा सबुरीचा सल्लाही देत अशा आशयाचे थोडा वेळ भाषण केले की, हातातल्या खंजीरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांच्या पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होऊन जाई कारण त्या वेळी जातीभेद जास्त प्रमाणात बोकाडला होता त्याची तमा न बाळगता ते सर्वांना समान वागणूक देत होते. सर्व जातीपंथाचे लोक त्यांचे अनुयायी झाले, तेव्हा पासुनच त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावांने संबोधू लागले. जगण्याचे तत्वज्ञान शिकविणारा राष्ट्रसंताचा “ग्रामगीता’ हा ग्रंथ लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे, हे त्यांनी दुरदृष्टि ठेवून त्याकाळी आवर्जुन सांगितले. आजच्या काळात अनेक समस्यांचे उपाय आपल्याला या ग्रामगीतेत मिळतात. भारत कृषिप्रधान देश आहे, म्हणून कृषि उद्योगात सुधारणा सुचविली. सामुदायिक प्रार्थना करावी, सर्वांशी प्रेमाने वागावे, गोवध हत्या बंदी व पशुसंवर्धन करावे, हे शिकविले.
23 एप्रिल 1947 रोजी नागपूरमधील श्री गुरुदेव सेवाश्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंन्द्रप्रसाद यांनी 1949 रोजी तुकडोजींना “राष्ट्रसंत” उपाधी प्रदान केली. पंढरपूरात 3 जुलै 1949 साली त्यांनी संत सम्मेलन घेतले. जनजागृती करीता ते विश्वधर्म परिषद व विश्वशांतीसाठी सयाम, ब्रम्हदेश व जपान येथे त्यांनी सर्वधर्म व सर्वांचा देव एकच आहे, हे खंजिरीवर भजनातून सांगितले. (हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक पर तू एक ही है). देशातील बडया-बडया मंडळींनी गुरुकुंज मोझरीच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाला भेटी दिल्यात. या वरुन आपल्याला राष्ट्रसंताचं महत्व लक्षात येते. चीन युध्द (1962) व पाकिस्तान युध्द (1965) साली झाले, त्यावेळी त्यांनी सौनिकास धीर देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ते स्वत: सीमेवर जाऊन त्यांनी वीर गीते सादर केली. ते प्रयत्नवादी होते, तन-मन-धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली म्हणुन ते खरे राष्ट्रसंत होऊन गेले. कारण समाज जागृती करतांना अख्खा देश त्यांनी पालथा घातला.

तुकडोजी 9 वर्षाचे असतांना आकडोजी महाराजांचे निंधन झाले. त्यामुळे तुकडोजी एकदम दु:खी झाले. त्याचवेळी ईश्वरचिंतनासाठी त्यांनी आपले घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि समाजोध्दारासाठी रानोमाळ फिरु लागले. चंद्रपूर जिल्हयातील घनदाट अरण्यात घोर तपश्चर्या करायला गेले, त्याठिकाणी 8-9 वर्षे जंगलात, रानावनात जे मिळेल ते खाऊन त्यांनी दिवस काढले. त्यानंतर ते समाजात परत आले आणि भजन-किर्तन व प्रवचन करीत सर्वत्र फिरु लागले. त्यांच्या लेखनातून ठायी-ठायी राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या संबंधीचे त्यांचे चिंतन प्रकट होते. हिंदुस्थान हा खेडयांनी बनलेला देश आहे. तेव्हा खेडयांची सुधारणा झाली तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखुन त्यांनी ग्रामसुधारणेची मोहीम हाती घेतली. गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी त्यांनी “ग्रामगीता’ हा ग्रंथ लिहिला. गांव हेच देऊळ आहे आणि त्या देवळातील देव म्हणजे गावातील लोक, असे त्यांचे मत होते.

भाषणे, भजन व किर्तन या माध्यमांतून त्यांनी राष्ट्रजागृतीचे महान कार्य केले. भारतीय समाजातील अनिष्ट रुढी व प्रथा बंद, अंधश्रध्दा, ढोंगीबाबा यावर प्रहार करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट सोसले. पशुहत्याबंदी, व्यसनमुक्ति, अस्पृश्योद्वार, जातिनिर्मूलन, यात्राशुध्दि, कुटुंब नियोजन, हुंडाबंदी इत्यादि कार्यांना ही त्यांनी चालना देऊन लोकजागृती केली. “जनसेवा हीच इश्वर सेवा” हा उपदेश त्यांनी लोकांना दिला. 1935 मध्ये त्यांनी मोझरी येथे “गुरुकुंज” आश्रमाची स्थापना केली. त्याठिकाणी त्यांनी लोक कल्याणाचे अनेक उपक्रम राबविले. देव देवाऱ्यात नाही, तो माणसात शोधा असे आवर्जून ते व्याख्यानात सांगत असंत. तुकडोजी महाराजांची किर्ती ऐकुन महात्मा गांधीनी त्यांना सेवाग्राम मध्ये बोलविले, तेथे राष्ट्रीय नेत्यांच्या डोक्यात देश स्वातंत्र्याच्या संदर्भात खलबत्ते सुरु असायचे ते त्यांनी हेरले. तुकडोजींची भजने ऐकुन ते प्रभावित झाले. तुकडोजींना सेवाग्राम मधील दीड महिन्याच्या वास्तव्यात अनेक राष्ट्रीय नेत्यांचा सहवास लाभला. त्यावेळी स्वातंत्र्याची चाहूल त्यांना लागली होती. त्यातून तुकडोजींच्या मनातही राष्ट्रप्रेम जागृत झाले आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्याचा निर्णय घेतला. 1942 च्या “चलेजाव” चळववळीच्या काळात त्यांच्या प्रचार कार्यामुळे विदर्भातील अनेक गावांत चळवळीचे लोण पोहोचले होते.

1925 साली त्यांनी ‘आध्नंदामृत’ ग्रंथाची रचना केली. 23 फेब्रुवारी 1935 रोजी सालबर्डी येथील यज्ञात आले. पुढे त्यांचा गांधीजींशी निकटचा संबंध आला आणि आणि त्यातुन त्यांनी 28 ऑगष्ट 1942 रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना अटक झाली, त्यामुळे त्यांची ख्याती वाढली आणि लोक त्यांना मार्गदर्शनासाठी परावृत करु लागले, अशातच 1943 मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला. 1943 ला गुरुदेव मुद्रणालयाची निर्मीती करुन “गुरुदेव” मासिकाचे प्रकाशन सुरु केले. 1943 रोजी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. हरिजनांसाठी त्यांनी मंदिरे खुली केली. त्यांचे प्रसिध्द ग्रंथसंपदा ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, जीवन जागृती भजनावली, राष्ट्रीय भजनावली आज ही ग्रामसुधार ही शासनाची योजना खेडोपाडी राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या नांवाने राबविली जाते. आदर्श गांव म्हणुन शासन दरबारी पारितोषिके प्रदान केली जाताहेत. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शिष्य म्हणून श्री सतपाल महाराज शहारोशहरी खेडोपाडी खंजरीच्या ठेक्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य मोठया ताकदीने करीत आहेत हे सर्वश्रृत आहे. अशा या राष्ट्रसंत तुकडोजींना त्यांच्या जयंती दिना निमित्ताने विनम्र अभिवादन !

प्रविण बागडे
जरीपटका, नागपूर – 14 भ्रमणध्वनी – 9923620919
ई-मेल pravinbagde@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here