चिमुर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनाखाली कांग्रेस चा झेंडा खांद्यावर घेऊन विविध प्रकारचे उपक्रम राबवून तथा वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य करणारे नाव म्हणजे दिवाकर निकुरे! 35 वर्षीय दिवाकर यांनी अल्पकाळात विविध उपक्रम राबवून प्रस्तापित राजकीय पुढाऱ्यांची जुनी गणिते दुरुस्त करण्यास भाग पाडले आहे, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. सध्या लग्नाचे सिजन सुरू आहे, लग्न हा कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांसाठी मंगलमय सोहळा असला तरी ज्यांचे घरी लग्नकार्य असते त्यांना खर्चाचा मेळ बसविताना बराच त्रास होतोच. लग्न या पवित्र कार्यात आपला थोडाफार हातभार लागावा या उद्देशाने कांग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे पुढे सरसावले आहेत. सध्या चिमूर व नागभीड तालुक्यातील बऱ्याच परिवाराना खाद्य तेलाची मदत ही दिवाकर निकुरे करीत आहेत. तेलाचे पिप्यावर असलेले मदतीचे स्ट्रिकर हा राजकीय चर्चेचा विषय असला तरी ज्या परिवाराला ही मदत मिळाली, त्यांचे चेहऱ्यावर असलेले समाधान सुखद आहे. निकुरे यांचे विविध उपक्रम व मदतकार्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून झळकत आहेत. चिमूर विधानसभा मतदारसंघात गरिबांना मदत करणारे दिवाकर निकुरे हे पहिले व्यक्ती नाहीत. या मतदार संघात विविध प्रकारची मदत करण्याचा प्रारंभ आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यानंतर युवा शक्ती संघटनाचे माध्यमातून विद्यमान आमदार भांगाडीया यांनी कित्ता गिरवला. कदाचित आजही भांगाडीया हे मदत करीत असतील मात्र आज प्रसार माध्यमातून येणाऱ्या बातम्या म्हणाव्या की जनतेचे प्रेम म्हणावे, सध्या फक्त दिवाकर निकुरे यांचेच नाव आघाडीवर आहे, कुठल्याही पदावर नसताना एवढी मदत करणे हा चर्चेचा विषय होणे साहजिकच आहे. असो, हा झाला मदतीचा भाग.बरेच लोक मदत करीत असतात, काही लोकांची चर्चा होते, काहींची दखल घेतली जात नाही. हा स्वतंत्र विषय आहे. दिवाकर यांच्या खाद्य तेलाची फोडणी राजकीय दृष्टीने अत्यंत परिणामकारक दिसत आहे. चिमूर विधानसभा मतदार संघात या पूर्वी कांग्रेसचे वारजूकर व भारतीय जनता पक्षाचे भांगाडीया सरळ व सोपे गणित होते. दिवाकर निकुरे या युवकाचे आगमनाने सर्वच राजकीय गणीतांवर तेल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकुरे यांचा झंझावात आपल्यालाच फायद्याचा होईल, अशी उघड-उघड चर्चा भारतिय जनता पक्षाचे कार्यकर्ते बोलताना दिसत असले तरी काही राजकीय जाणकार भाजप नेते सावध पवित्रा घेऊन कामाला लागल्याची चर्चा आहे. कांग्रेसची उमेदवारी डॉ. सतिश वारजूकर यांनाच मिळेल असा दावा करून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दुसरीकडे दिनांक 13 एप्रिल रोजी चिमूर येथील फुले-आंबेडकर जयंती कार्यक्रमातील दिवाकर निकुरे यांचे नेतृत्व फुलवण्यासाठी आमदार वडेट्टीवार यांचे भाषणातील प्रत्येक शब्दाचा अर्थ स्थानिक पातळीवरील राज्यशास्त्र अभ्यासकांना स्वतंत्र विषय ठरला आहे.
सुयोग सुरेश डांगे मो. 8605592830