भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्य घटना दिली. संविधान दिले. बाबासाहेबांनी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आधी शेडयूल कास्ट फेडरेशन काढले होते. पंडीत जवाहरलाल नेहरु मंत्रीमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेमंत्री होते. त्यानंतर आज इतक्या वर्षांनी रामदास आठवले हे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात आहेत. आज रिपब्लीकन पक्षाचे किती वेगवेगळे पक्ष आहेत. किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणुन किती नेते पक्ष चालवत आहेत याची मोजदाद नाही.
प्रत्येक पक्षाचा वापर राष्ट्रीय पक्ष करुन घेतोय. प्रत्येक वेळी १४ एप्रील आणि ६ डिसेंबर आली की ऐक्याच्या गुळगुळीत बातम्या वाचायला मिळतात. ऐक्यवादी पक्षाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर हे जर करणार असतीलच तर मी मंत्रीपद सोडेन ही रामदास आठवले यांनी बऱ्याच वेळा घोषणा केली पण आंबेडकर ऐकायला तयार नाहीत.
रिपब्लीकन पक्षाच्या सर्व गटांचे ऐक्य व्हावे म्हणुन काही तरुणांनी आमरण उपोषण केले होते. आणि त्यांची परिणती म्हणुन १९९८ साली रामदास आठवले हे उत्तर मध्य मुंबईतून, रा. सु. गवई हे अमरावती मधुन, प्रा. जोगेंद्र कवाडे हे चिमुर मतदारसंघातुन आणि प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडुन आले होते.
एकाच वेळी आंबेडकरी विचारधारेचे किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणविणारे चार चार खासदार निवडून येणे हा खरोखरच एक चमत्कार मतदारांनी घडवून आणला होता. पण हा आनंद क्षणिक ठरला.
१९९९ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पुन्हा चार खासदार चार दिशेला निघून गेले. आज ते उपोषण करणारे ते तरुण कुठे आहेत याची कुणालाही कल्पना नाही. रा. सु. गवई त्यांनी राज्यपाल पदापर्यंत वाटचाल केली. त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई हे आघाडीत आहेत पण ते निवडणुकीच्या मैदानात नाहीत. प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन ठिकाणाहुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ओवेसी यांच्या खांद्याला खांदा लावुन त्यांनी वंचित आघाडी बनविली. आता त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याबरोबर मैत्री केली आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला ती मैत्री मानवेल असे दिसत नाही.
रामदास आठवले हे मोदी-फडणवीस यांच्या बरोबर महायुतीच्या माध्यमातुन बँड वाजवत आहेत. त्र्यंबक मारुती कांबळे (टी. एम. कांबळे) यांच्यासारखे अनेक रिपब्लीकन पक्षही कुणाच्या अन् कुणाच्या बरोबर आहेत. जागेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आम्ही निवडुन आलो नाही तरी आम्ही कुणाच्या तरी पाडु शकतो. अशी प्रवृत्ती बळावत चालली आहे. आमचा प्रत्येक राष्ट्रीय पक्ष हा लोणच्यासारखा तोंडी लावण्याकरिता वापर करुन घेत हेही लक्षात येते की नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आटापिटा चाललाय पण ते प्रत्यक्षात केव्हा येईल याचा अंदाज नाही.
सकाळी उठले की प्रत्येक नेता हा शाहू, फुले, आंबेडकर या नावाची जपमाळ सुरुवात करतो आणि काही जण संध्याकाळी आपटे, आगाशे, डहाणूकर, गडकरी, फडणवीस यांच्या कट्ट्यावर बसतात. १९९८ साली एकाचवेळी निवडून आलेले चार खासदार हा केवळ इतिहास राहणार की ही ‘निळाई’ भविष्यात वाढणार हे रिपब्लीकन नेत्यांवर अवलंबुन आहे.
रामदास आठवले, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, सोनावणे, स्व. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख, प्रा. ज. वि. पवार आदी नेत्यांनी चर्चा करून एक मजबुत पर्याय उभा करता येऊ शकेल का? यावर काहीजन विचार करीत असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेतील सत्य आणि तथ्य काय असेल हे निसर्गालाच माहित.
चार दोन तुकडयाऐवजी घसघशीत वाटा सत्ताधारी पक्षांकडुन मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे. कार्यकर्त्यांना अच्छे दिन कधी दाखविणार? यासाठी आंबेडकरी जनतेने रेटा लावायला काय हरकत आहे? यावर चर्चेला सुरुवात करावी, या उद्देशाने सदर टिपण केले आहे. हा शब्दप्रपंच सामान्य जनतेनी चर्चा करुन नेत्यांना काही सुचवावेत या हेतुने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखात खुप मोठे संदर्भ नसले तरी चर्चेची सुरुवात करण्याकरीता पुरेशे वाटते.
✒️सुरेश डांगे(संपादक साप्ताहिक पुरोगामी संदेश)मो:-8605592830