धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर
धरणगांव – आज दि.२०/०४/२०२३ रोजी धरणगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या १ नंबर शाळेत शाळा पूर्व तयारीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाळेत उपस्थित शिक्षकांची चर्चा सुरु असतांनाच,शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र गायकवाड यांनी लक्षात आणून दिले की, आजच्या या प्रशिक्षणाच्या दिवशीच आमच्या शाळेचा स्थापना दिवस- २०/०४/१८५९ ही आहे. मग काय शाळेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकवृंद लगेचच शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्याच्या तयारीला लागले.
बांभोरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.ज्ञानेश्वर माळी,शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र गायकवाड, तसेच त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व बांभोरी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत शाळेचा १६४ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या व शाळेच्या आजी – माजी शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते केक कापून शाळेचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
शाळेचा इतिहास सांगताना,”ही धरणगावची पहिलीच शाळा असल्याचे अभिमानाने सांगितले गेले.”महात्मा जोतीराव फुले यांनी मुलींसोबतच बहुजनांच्या शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य हाती घेतल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षातच पूर्व खान्देशातील धरणगाव या तत्कालीन प्रसिद्ध बाजारपेठेच्या गावातही शाळा सुरु करण्यात आली. शहरातील अनेक राजकीय-सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी याच शाळेत धडे गिरवले आहेत. बऱ्याच जणांना समाजकारणाचे बाळकडू याच शाळेने दिले आहे. पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थीसंख्याही होती. खाजगी शाळा सुरू झाल्यामुळे शाळेवर निश्चितच परिणाम झाला आहे, मात्र आजही ही शाळा इ.सातवीपर्यंत जोमात सुरु आहे.
शाळेत डिजिटल शिक्षणासह, मोठा भौतिक परिसर, सुसज्ज इमारत व पुरेसा शिक्षकवृंद आहे. शाळेचा वाढदिवस साजरा झाल्याने उपस्थित मान्यवरांनी समाधान व आनंद व्यक्त केले.तसेच स्पर्धेला तोंड देत ठामपणे टिकून राहण्यासाठी व शाळेच्या भविष्यातील विकासासाठी शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकांनी परिश्रम घेतले. श्री राजेंद्र रूंझू गायकवाड हे त्याच शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण मराठी शाळेत झाले असल्याने त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी केल्या व आज त्याच शाळेत ग्रेडमुख्याध्यापक असल्याचा अभिमान बाळगतात. कार्यक्रम प्रसंगी अभय सोनार, अर्चना पाटील देसले मॅडम, वैशाली पोतदार संदीप देसले ,भदाने सर, महेश पारेराव वाणी सर, संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.