पुणे – पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल जरी आधुनिकतेच्या दिशेने होत असली तरी आजही खेड्यापाड्यात, गावोगावी आणि अगदी शहरात सुद्धा मुलींना शिक्षणासाठी अक्षरशः रक्ताचं पाणी करावं लागतं. कधी फी भरण्यासाठी पैसे नसतात म्हणून मुलीच्या कुटुंबाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो तर कधी शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून मुलीला थेट लग्नमंडपाचा रस्ता धरावा लागतो. सर्वच बाजूंनी मुलींच्या शिक्षणविषयक अपेक्षांवर नैराश्याची कुऱ्हाड येते.
गेले अनेक वर्ष अशा अनेक मुली पुण्यातील चिंचवडच्या ‘ओम प्रतिष्ठान’कडे धाव घेताना दिसत आहेत. त्याचं कारण आहे ‘विद्यादान चळवळ’. हुशार, गरजू आणि होतकरू मुलींना संस्था आर्थिक पाठबळ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. आतापर्यंत ३० हुन अधिक मुलींना ओम प्रतिष्ठानकडून त्यांच्या शैक्षणिक शुल्कामुळे अडून राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यात यश आलं आहे.
या वर्षात १०० मुलींना त्यांच्या स्वप्नांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ओम प्रतिष्ठानकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पुढील वर्षांसाठी लागणाऱ्या शैक्षणिक खर्चाचा तपशील, गुणसंख्या तसेच इतर माहिती अर्जात नमूद करून उत्पन्नाचा तपशील दिल्यास संस्थेकडून मुलाखतीसाठी निवड करण्यात येणार आहे. विद्यादान प्रक्रिया एप्रिल पासून सुरु होणार असून निवड प्रक्रिया आणि मुलाखत मे महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मुलींनी ompratishthan.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे.
ग्रामीण भागातील मुलींना ‘ओम प्रतिष्ठान’ कडून दिली जाणारी ही मदत देणगीच्या स्वरूपात मिळालेल्या रकमेतून दिली जाते. संस्थेने जाहीर केलेल्या विद्यादान चळवळीला कर्तव्यदक्ष नागरिकांकडून प्रतिसाद मिळतो आहे. “अधिकाधिक मुलींना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वांनी ओळखीत असलेल्या गरीब गरजू मुलींपर्यंत विद्यादान चळवळ पोहचवावी तसेच देणगीदार नागरिकांपर्यंत देखील संस्थेच्या कार्याची माहिती द्यावी.” असे आवाहन ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक वनिता सावंत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ईमेल contact@ompratishthan.in
संपर्क क्रमांक -9822509124