नागपूर : प्रत्येक माध्यमांच्या गरजा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत. त्या गरजा, समस्या आणि आव्हाने ओळखत त्यावर मात करता आली पाहिजे, असा सूर व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनातील परिसंवादात उमटला.
“बदलती पत्रकारिता आणि आव्हाने” या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे, महासागरचे संचालक, संपादक श्रीकृष्ण चांडक, ज्येष्ठ संपादक सुनिल कुहीकर, लोकशाहीचे संपादक श्रीधर बलकी सहभागी झाले.
यावेळी बोलताना गावंडे म्हणाले की, आज पत्रकारांजवळ उपलब्ध असलेल्या माध्यमांपेक्षा अनेक अनिर्बंध माध्यमे लोकांजवळ आहेत. पत्रकारांसाठी देखील आचारसंहिता असणे गरजेचे आहे. पत्रकारांबद्दल विश्वासार्हता अधिक दृढ झाली पाहिजे. ‘वेबपोर्टल’ पत्रकारितेच्या युगात ही विश्वासार्हता अधिक गरजेची आहे, कारण ‘वनमॅन शो’ पत्रकारितेत धैर्य आणि विश्वासार्हता गरजेची आहे.
श्रीकृष्ण चांडक म्हणाले, पत्रकारितेचा काळ बदलत आहे. अग्रलेखांचा आकारही आता कमी झाला आहे. लिखित माध्यमांपेक्षा व्हिडीओ माध्यमांचे चलन वाढले आहे. त्यामुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलत आहे. साखळी वृत्तपत्रांच्या समस्या अधिक गंभीर आहेत. त्यांच्यापुढे पत्रकारांचे वेतन, जाहिरातीचा महसूल, टिकाव आणि वाढत चाललेला खर्च अशा समस्या आहेत.
सुनिल कुहीकर म्हणाले, लेखणीची ताकद जबरदस्त आहे. २४० वर्षांच्या पत्रकारितेच्या इतिहासात पाहता पत्रकारांची स्थिती आजही जेमतेम आहे. वर्तमानपत्र पूर्वी सामाजिक चळवळीची माध्यमे होती. आता हे क्षेत्र देखील व्यावसायिक झाले आहे. परकीय गुंतवणूक सुरू झाल्यापासून तर हा व्यवसाय अधिक जोमात झाला आहे. पत्रकारांची आधुनिक युगानुसार ‘टेक्नॉलॉजी आणि टेक्निक्स’ याबाबतीत स्वत:त बदल घडवावे, असे ते म्हणाले.
समारोपीय भाषणात पांडे म्हणाले, पत्रकारांना विशेषाधिकार असा नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकांना आहे. त्यामुळे सिटीझन जर्नालिझम ही बाब अधोरेखित होते. पत्रकाराच्या बातमीत दम असेल तर त्याने कुणालाही घाबरू नये. आजच्या नव्या पिढीला ‘बातमी’ पेक्षा ‘मनोरंजन’या क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे हा वर्ग टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान पत्रकारीतेपुढे आहे.