🔸वरूड तालुक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर !
✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
वरुड(दि.17एप्रिल):-पीडित, शोषितांच्या अंधारलेल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणारे प्रज्ञासूर्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
प्रतिकूल स्थितीतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान मानवतावादी कार्याची माहिती आताच्या तरुण पिढीपर्यंत पोचणे आवश्यक आहे. म्हणूनच भाजपतर्फे आज देशभर या महापुरुषाची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांनी साकारलेल्या संविधानामुळे आज देशात समता प्रस्थापित झाली आहे, याचा लाभ लोकशाही बळकट होण्यासाठी झाला आहे, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. वरूड तालुक्यात आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
वरूड तालुक्यात विविध ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करत पदयात्रेत दाखल झालेल्या भीमसैनिकांनी निळे झेंडे, पताकांनी सजलेल्या परिसरात जनतेत हर्षोल्हास पाहायला मिळाला. विविध ठिकाणी बाबासाहेबांच्या गीतांनी वातावरण भीममय झाले होते.
आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, डॉ.आंबेडकर यांच्या कार्याचा विसर पडता कामा नये, त्यासाठी त्यांच्या कार्याची माहिती देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले पाहिजे, त्यांच्या कडे असलेल्या दुरदृष्टीतून साकारलेल्या संविधान अर्थात घटनेचे आजही पालन केले जाते, ही चांगली बाब आहे. त्यामुळे आज समाजातील प्रत्येक घटकांनी त्यांच्या कार्याचे अनुकरण केले पाहिजे. त्यासाठी तरूण पिढीने उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करून आपला गाव पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.