भारतीय रेल्वे सेवेतून 40 वर्षे 7 महिने एवढी प्रदीर्घ सेवा करून श्री कन्हैयालाल शेषराव भोरे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त हा लेख.
माणसाचे आयुष्य हे एका खेळासारखे आहे. प्रत्येक पायरीवर ते कठीण होत जाते तसेच ते मजेशीरही होते. आयुष्याचा प्रत्येक टप्पा माणसाला नवीन अनुभव देतो. लहानपणापासून ते म्हतारपणापर्यंत हे अनुभव आपल्याला मिळतच जातात.असाच आयुष्याच्या खेळाचा एक टप्पा म्हणजे सेवानिवृत्ती. आयुष्याचा हा टप्पा माणसाला खूप काही शिकवतो. ज्या कामासाठी आपण आपले पूर्ण आयुष्य वाहिले ते काम आता कायमचे सोडायचे ह्या विचाराने देखील जीव गुदमरून जातो.
सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसतेनिरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते धागे असता जुळलेले हृदयाचे हृदयाशी
आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भोसरे सारख्या खेडेगावात शेषराव भोरे यांच्या सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेऊनही आपण आपल्या नावातील कन्हैया प्रमाणेबुद्धीचे तेज सर्व दूर पसरवूनआप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांना आपलेसे करत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा सर्व दूर पसरविला. आपल्या भोवती पेजपुंज बुद्धीचे वलय निर्माण करून कन्हैयाच्या सार्थ लीला मधून सर्वांना आनंदाची शिदोरी कायमच देत आला आहात.
श्री दत्तप्रभू आणि चक्रधर स्वामी या परमदैवतांचा आशीर्वाद आपल्या समवेत सदैव होताच परंतु आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा स्पष्टवक्तेपणा, धारिष्टय, सच्चाई व बाणेदारपणा तसेच हृदयात वाहणारा अखंड प्रेमाचा झरा यामुळे कोणीही आपणास कधी परका वाटलाच नाही. संकटे छोटी असो की मोठी असो आपण ती मन, मेंदू, मनगट यांच्या बळावर आणि अविरत कष्ट करत त्यावर मात करण्याचे कौशल्य प्राप्त केले. दुःखालाही कवेत घेऊन आनंदाने जगण्याची आपली हिम्मत वाखाणव्या जोगी आहे. पाच पांडवाप्रमाणे आम्हाला पंचरत्न बहाल केलेत. ती म्हणजे व्यवस्थापन, सर्वसमावेशकता, मानवता, अध्यात्मिकता आणि हृदयातील प्रेमाचा सागर या पंचरत्नांचा आम्हाला अनुभव पावलोपावली अनुभवता आला याचा विशेष आनंद आहे.
आपण आणि आपले कुटुंब एकाच नाण्याच्या दोन बाजू. सप्तसुरांचा संगम तुमच्या संसारात झाला आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील आनंदाची लय कधी बिघडलीच नाही. आपल्याला प्राप्त झालेल्या रसाळ वाणीमुळे समोरच्यावर एक वेगळीच छाप पडायची.
आपण घरासाठी अविरत कष्ट करत आलात. वेळप्रसंगी कठोर होऊन शिस्त आणि संस्कार केलेत याचा प्रत्यय आपल्याला सर्व कुटुंबीयांच्या प्रगतीत दिसून येतो.
जे का रंजले गांजले त्यासी करूया आपले
तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.
या न्यायाने आपण सतत मायेने सर्वांना जवळ करून त्यांच्यावर अतोनात प्रेम केले. या आपल्या निस्वार्थ प्रेमामुळेच माणसातला देव माणूस असे शब्द प्रत्येकाच्या ओठी उमटतात.
आपला जन्मदिवस 6 मार्च 1963. तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीतूनही आपण उच्च शिक्षणाचे ज्ञानकण वेचले. यानंतर कुटुंबाच्या चरितार्थासाठी 19 ऑगस्ट 1983 रोजी प्रथमच भारतीय रेल्वेमध्ये सेवा करण्याची संधी आपणास प्राप्त झाली. नोकरी करीत असताना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला की आपल्या ज्ञानातून अनेक जण प्रशिक्षित झाले. आपल्या कार्यकर्तृत्वाचा परिपाक म्हणून 1997 ला सी ग्रेड मिळाली . 2000 साली कुर्डुवाडी या जन्मभूमीत सेवा करून अनेकांना मार्गदर्शक ठरलात. 2007 ला पुन्हा पुण्य भूमीत वरिष्ठ टेक्निशियन म्हणून घोरपडी येथे लोको शेडला काम करत आलात. 2016 ला एमसीएम ही ग्रेट प्राप्त करून आपल्या कौशल्याचे वेगळेपण सिद्ध केले.
आपल्या कार्यातील कार्य कुशलता, कार्यतत्परता व प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीवर आपल्या जीवनाचा चढता आलेख उल्लेखनीय आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी चाले याप्रमाणे आपल्या आचरणातून एक वेगळा आदर्श व शिस्त सर्वांना घालून दिलीत. आपला आचार, विचार व कृती यातील समन्वय बहुत जनासी आधार ठरलेला आहे. शुद्ध, स्थिर, व्यापक व परिपूर्णता म्हणजेच परमार्थ हा कानमंत्र आपण कायमच आयुष्यभर जपला.
सत्य असत्याशी मन केले ग्वाही
मानियेले नाही बहुमता म्हणून सर्वांना आपण मार्गदर्शक दीपस्तंभ ठरला. आपल्या आयुष्यात सौ. मनकर्णिका यांचा हातभार न विसरता येण्याजोगा आहे. आपल्या दोन्ही मुलांना, सुन, पुतणे आणि भाऊ यांना प्रेमाने आपले करून त्यांना शिक्षणसन्मुख केले. आपण आम्हाला अधिक प्रगत आणि प्रगल्भ करण्यात सिंहाचा वाटा उचलला. आपल्याशिवाय आम्ही सर्वजण अपूर्ण आहोत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत. असाध्य ते साध्य करिता यास यानुसार अवघड असणारी गोष्ट ही सहजतेने करत आलात याचा आदर्श आमच्या सर्वांपुढे आहे.
सप्त सूर हवे नको आता मोहाची साठवण. सुगंध तुमचा दरवळावा. म्हणून हे लेखन आपल्या कार्या आणि कर्तुत्वाचा ठसा आम्हाला सदैव दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल.
भाऊ आपली राहणी साधी असली तरी कार्य आणि कर्तुत्व खूप महान आहे आपल्या विषयाची एक नितांत श्रद्धा आमच्या मनाच्या अंतरंगात आयुष्यभर जपून ठेवली आहे. आपला अतिशय विनम्र स्वभाव आणि योग्य मार्गदर्शन सर्वांनाच भावते. आपला हा वारसा आपली पुढील पिढी समर्थपणे चालवत आहे. आपल्या कार्याचा सुगंध आज दरवळत आहे. या अर्थाने आपण कर्मयोगी आहात. आपले पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे, संपन्नतेचे आणि आरोग्यदायी जावो. हीच आपणास सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा!!
✒️प्रा. संतोष बोंगाळे(वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड)