Home खेलकुद  इंक्रेडीबल प्रीमियर लीग

इंक्रेडीबल प्रीमियर लीग

99

जगातील सर्वात महागडी लीग म्हणून ओळखली जाणारी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरवात ३१ मार्च पासून झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या हंगामाचे दिमाखदार सोहळ्यात उदघाटन झाले. उदघाटनाचा सामना विद्यमान चॅम्पियन गुजरात टायटन व चेन्नई सुपर किंग यांच्यात झाला. या सामन्यात विद्यमान चॅम्पियन गुजरातने चेन्नईवर पाच धावांनी विजय मिळवला. ३१ मार्च पासून सुरू झालेला आयपीएलचा थरार पुढील दोन महिने चालू राहणार असल्याने क्रिकेट प्रेमींसाठी ती मोठी मेजवानी ठरणार आहे. २०२० पासून कोरोनारुपी महामारीने जगावर दहशत माजवली. इतर क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाचा फटका बसला. आयपीएललाही कोरोनाचा मोठा फटका बसला. कोरोनाच्या सावटातही बीसीसीआयने आयपीएलचे यशस्वी आयोजन केले. कधी देशात तर कधी परदेशात आयपीएलचे सामने झाले. २०२० साली तर आयपीएलचे दोन टप्प्यात आयोजन करावे लागले होते कारण अनेक खेळाडूंना कोरोनाने घेतले होते. २०२० आणि २०२१ साली कोरोनामुळे प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळत नव्हता.

त्यामुळे प्रेक्षकांना आयपीएलचा थरार प्रत्यक्ष मैदानात बसून अनुभवता आला नाही मात्र मागील वर्षापासून प्रत्यक्ष मैदानात बसून प्रेक्षकांना आयपीएलचा थरार पुन्हा अनुभवता आला. मागील वर्षी गुजरात टायटन आणि लखनौ लायन्स या दोन नव्या संघाची भर पडली. पहिल्याच वेळी या दोन्ही संघाने चांगली कामगिरी केली. लखनौ संघ अंतिम चारमध्ये पोहचला गुजरात टायटनने तर कमालच केली पहिल्याच प्रयत्नात हा संघ चॅम्पियन ठरला. हार्दिक पांड्यने गुजरात टायटन संघाचे अप्रतिम नेतृत्व केले. यावेळीही हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नईला पराभूत करून त्यांनी त्याची झलक दाखवून दिली आहे. गुजरात प्रमाणेच चेन्नई आणि मुंबई हे दोन संघ देखील नेहमीप्रमाणे विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. आयपीएलचा इतिहास पाहिला तर याच दोन संघाचे आयपीएलवर वर्चस्व राहिले आहे. मुंबईने आजवर पाचवेळा आयपीएल जिंकत विक्रम केला आहे तर चेन्नईने चार वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले आहे. कोलकाता आणि हैदराबाद या संघाने अनुक्रमे दोनदा विजेतेपद मिळवले आहे.

राजस्थान रॉयलने पहिली २००८ सालची आयपीएल जिंकली होती तर मागील वर्षी गुजरातने. यावर्षीही मुंबई, चेन्नई आणि गुजरात हे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असले तरी कोलकाता आणि बंगळुरू हे संघ देखील विजेतेपद मिळवू शकतात अर्थात आयपीएलमध्ये कोण विजेता ठरेल हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. मागील वर्षी गुजरात विजेतेपद पटकाविल असे कोणालाही वाटले नव्हते तरीही गुजरातने विजतेपद पटकवण्याची किमया केली. कोण जाणे कदाचित यावेळीही आयपीएलला नवा विजेता मिळेल. आयपीएलची हीच खासियत आहे म्हणूनच ती जगातील सर्वाधिक लोकप्रिय लीग ठरली आहे. मागील पंधरा वर्षाप्रमाणेच या वर्षीची आयपीएल स्पर्धा देखील कमालीची लोकप्रिय होणार यात शंका नाही. आज आयपीएल हा आता भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. जगातील सर्वच देशांचे दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. आयपीएलने क्रिकेट विश्वाला अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहेत. भारतीय संघातील आताचे सर्वच खेळाडू हे आयपीएलचीच देण आहे. पूर्वी रणजी सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारताच्या संघात प्रवेश मिळायचा आता मात्र आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच भारताच्या संघात प्रवेश मिळतो त्यामुळे सर्व खेळाडू मैदानावर जीवाचे रान करतात.

आपला सर्वोत्तम खेळ करून राष्ट्रीय संघात प्रवेश करण्यासाठी आणि आपल्या फ्रांचायजी संघाला विजयी करण्यासाठी मैदानावर घाम गाळतात प्रेक्षकही या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी वाटेल ती किंमत मोजतात त्यामुळेच या इंडियन प्रीमियर लीगला इंक्रेडीबल प्रीमियर लीग असेही म्हणतात.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here