Home बीड खळबळजनक! 3 लाखांच्या खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

खळबळजनक! 3 लाखांच्या खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

91

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.27मार्च):-खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीचे अपहरण करून 3 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला. या प्रकरणी आष्टी पोलिसांनी घटनेचा गोपनीय आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून इंदापूर-भिगवन परिसरातून मुलीची सुटका केली. पोलिसांनी खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बीड: आष्टी शहरातील एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडून खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खंडणी बहाद्दरांनी त्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. आष्टी पोलिसांनी गोपनीय पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून इंदापूर-भिगवन परिसरातून पीडित मुलीची सुटका केली. पोलिसांनी खंडणी मागणाऱ्याला अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आष्टी पोलिसांच्या तत्पर कर्तव्याचे कौतुक होत आहे.

सायबर विभाग झाला सतर्क: कॉन्ट्रॅक्टरकडून खंडणी मिळावी म्हणून अज्ञात व्यक्तीने 25 मार्चच्या रात्री त्याच्या मुलीचे अपहरण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून कॉन्ट्रॅक्टरने याची माहिती आष्टी पोलिसांना दिली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे यांच्याकडे देण्यात आला आहे. तपासासाठी पोलिसांनी एक पथक नियुक्त केले. यानंतरही खंडणी बहाद्दराकडून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वारंवार 3 लाख रुपयांच्या मागणीचा फोन येत होता. दुसरीकडे आष्टी पोलीस आणि सायबर विभाग या फोनवर लक्ष ठेवून होते.

अखेर ‘त्या’ मुलीची सुटका: आष्टी पोलिसांनी तांत्रिक तपास करत संबंधित आरोपी आणि पीडित मुलगी ही इंदापूर-भिगवन परिसरामध्ये असल्याची माहिती मिळविली. यानंतर सापळा रचण्यात आला. पाहणीत खंडणी बहाद्दरांनी पीडित मुलीला डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या ध्यानात आले. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची सुटका करत तिला स्वत:च्या ताब्यात घेतले. कारवाईत संबंधित अपहरणकर्त्याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आष्टी पोलिसांनी 36 तासांत या प्रकरणाचा छडा लावल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.

‘या’ पोलिसांनी केली कारवाई: या कारवाई प्रकरणी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. अजित चाटे, पो.ना. प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव, महिला पोलीस स्वाती मुंडे, अंमलदार शिवप्रसाद तवले, सचिन कोळेकर यांनी कर्तव्य बजावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here