✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.24मार्च):-झाडीबोली साहित्य मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात झाडीपट्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून सोबतच तालुक्यातील सहा ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन येत्या २६ मार्च रविवारला खैरे कुणबी समाज भवन येथे राजुरा निर्वाचन क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे तसेच प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांच्या वृंदावन या कवितासंग्रहाचे प्रकाशन तसेच निमंत्रीत कवींचे कवी संमेलन आयोजित केले आहे.
गोंडपिपरी तालुक्याला सांस्कृतिक वारसा लाभला असून तालुक्यातील ज्येष्ठ रंगकर्मी उद्धव पिठुजी नारनवरे, तोहोगाव (नाट्य दिग्दर्शक),राजेश्वर आत्माराम कोहपरे, वढोली (नाट्यकलावंत),पत्रुजी किसन सांगडे, धाबा (प्रवचनकार),झावरुजी बुधाजी फुलझेले, बोरगाव (रंगकर्मी),ओमाजी पाटील पिंपळकर, विठ्ठलवाडा (दंडार),दयानंद लिंबाजी सिडाम, गोंडपिपरी (नाट्यकलावंत) यांचा वर्धापनदिनी मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील नाट्यकर्मी तसेच साहित्यिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन झाडीबोली साहित्य मिळण्याचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी केले आहे.