🔹माणगाव ऐतिहासिक परिषदेचा शताब्दी महोत्सव संपन्न
✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि. 24मार्च):- महापुरूष कोणत्याही एका जातीचे किंवा विभागाचे नसतात ते देशाचे असतात ते संपूर्ण मानवतेचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचारांचा वारसा महात्मा फुलेंनी पुढे नेला ,छत्रपती शाहूंनी तो पुढे नेला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तो बहुजनात नेला ,महापुरुषांनी जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांनी माणगांव येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर च्या वतीने आयोजित ऐतिहासिक माणगाव परिषदेचा शताब्दी महोत्सव कार्यक्रमात केले. कोरोना च्या काळात निर्बंध असल्याने शताब्दी महोत्सव या वर्षी झाला.
या प्रसंगी ऐतिहासिक माणगाव परिषदेचे आयोजक आप्पासाहेब पाटील यांचे नातू विक्रमसिंह पाटील प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ भीमराव आंबेडकर पुढे असे म्हणाले की, आज जातीयता नष्ट करण्यापेक्षा ती घट्ट होताना दिसत आहे ,हे समाजासाठी घातक ठरत आहे. आम्ही विचाराचे वाहक आहोत ,आम्ही चळवळ करीत राहू. या वेळी एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर, समता सैनिक दल ),जगदीश गवई (राष्ट्रीय उपाध्यक्ष ), सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष ), डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण (बार्टी ), गुलाबराव अवसरमोल (माजी न्यायाधीश ), भिकाजी कांबळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांची भाषणे झाली.
या प्रसंगी डॉ भीमराव य आंबेडकर व विक्रमसिंह पाटील यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.सन 2020 मध्ये तयार करण्यात आलेला ऐतिहासिक माणगाव परिषद शताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे बी एच गायकवाड ,अँड एस एस वानखडे , राजेश पवार ,बी एम कांबळे, रागिनीताई पवार, एस आर कांबळे ,रुपेश तामगावकर, सुनंदाताई वाघमारे , स्वातीताई शिंदे , सुशील वाघमारे , विजय कांबळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी कोल्हापूर शहराच्या बिंदू चौक येथील महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना डॉ भीमराव आंबेडकर व एस के भंडारे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून दुचाकी- चारचाकी वाहन रॅली बिंदू चौक ते माणगाव काढण्यात आली. रॅलीत समता सैनिक दल ,भारतीय बौद्ध महासभा व समाजातील युवक मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते.
यावेळी दोन महत्वाचे ठराव करण्यात आले ते असे की,1)डॉ बाबासाहेब आंबेडकर माणगाव येथे परिषदेसाठी आले होते त्यावेळी ते ज्या प्राथमिक शाळेत वास्तव्यास होते ती दुरावस्थेत असलेल्या शाळेचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावे.2)माणगाव येथील गांव तलावाचे सुशोभीकरण करून तेथे शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे उभारावेत. या ठरावाचे वाचन व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अरविंद कांबळे यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष एस पी दीक्षित होते.
सभेच्या सुरवातील समता सैनिक दलाच्या उपस्थित समाजातील तथागत बुद्ध , डॉ बाबासाहेब व शाहू महाराज व आप्पासाहेब पाटील यांच्या पुतळ्यांना /फोटोंना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर समता सैनिक दलाच्यावतीने अशोक कदम, दादासाहेब भोसले, डी एम आचार्य,बव्ही डी हिवराळे,पी एस ढोबळे इत्यादीं 130 सैनिक /अधिकारी यांनी डॉ भीमराव य आंबेडकर यांना जनरल सलामी.सभेच्या पूर्वी जनतेसाठी शाहिरा सिमा पाटील व जॉली मोरे यांचा आम्ही भारताचे लोक -संगीतमय महानाट्य आयोजित करण्यात आले होते. अनुयायांसाठी भारतीय बौद्ध महासभा व बार्टी यांच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या ऐतिहासिक महोत्सवास कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नांदेड, परभणी इत्यादी विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते,जनता प्रचंड संख्येने उपस्थित होती.