🔸मोर्शी तालुका कृषी विभागाचा अभिनव उपक्रम !
🔹शेती शाळेच्या माध्यमातून शेकडो शेतकरी होत आहे प्रशिक्षित !
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.23मार्च):-तालुक्यात भीषण दुष्काळातून अथक परिश्रम घेऊन जगवलेल्या संत्रा बागांवर बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसत आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा गळती, संत्रा झाडांची पाने पिवळी पडून संत्रा झाडे वाळत चालली आहे. यावर सर्व उपाययोजना करून काही उपयोग होत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले असतांना मोर्शी तालुका कृषी विभागाने व संशोधकांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शेती शाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केल्या जात आहे.
संत्रा पीक शेतकऱ्यांची शेती शाळेच्या माध्यमाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व संत्रा उत्पादन वाढ करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना विविध उपाय योजना सुचविण्यात आल्या.
दापोरी येथील प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी विजय विघे यांच्या संत्रा प्रक्षेत्रवर जाऊन संत्रा पीक परिसंस्थेच्या अभ्यास पिकाचे निरीक्षणे घेऊन प्रत्यक्ष कृतीतून पिकावरील नुकसानकारक शत्रू कीड ओळख आणि मित्र किडींची ओळख करणे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन ,कामगंध सापळे , निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, रस शोषणारे किडी मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढरी माशी यांचे नियंत्रण बाबत मार्गदर्शन कीड व अळीचे व्यवस्थापन , एकात्मिक तण व्यवस्थापन, मृद आरोग्य पत्रिका आधारित किंवा जमीन सुपीकता निर्देशांक व पीक शिफारस नुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थपन व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणीद्वारे खते देणे, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करणे. अश्या उपाय योजना शेतकऱ्यांना सुचविण्यात आल्या.
त्यावेळी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ अनिल ठाकरे, तालुका कृषी अधिकारी साजणा इंगळे, मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग म्हस्के, कृषी पर्यवेक्षक मोहन फुले, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी विजय विघे, रुपेश अंधारे, प्रभाकर तायवाडे, अनिरुद्ध पाटील, शिरीष विघे, अतुल काकडे, किशोर फलके, पुरुषोत्तम अंधारे, महादेव मासाने, संदीप बिले कृषी सहाय्यक मनीष काळे, संजय अंधारे, नवले साहेब, गहुकर साहेब यांच्यासह आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेती शाळेचे आयोजन करून शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला देऊन योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल दापोरी गावातील प्रगतशील शेतकरी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी संशोधक मंडळी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार मानले.
शेती शाळेच्या माध्यमातून शेतिशाळेत सहभाग घेणारे शेतकरी यांचे मध्ये स्वत:चा आत्मविश्वास निर्माण होतो. स्वत:ला निर्माण झालेल्या अडचणी,शंका तो मांडू शकतो व चर्चा करू शकतो. एकात्मिक पिक व्यवस्थापन करताना कोणती पद्धती योग्य की अयोग्य या बाबतीत तो संभ्रमावास्थेत न राहता आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो, शेतिशाळेत स्वत: प्रात्यक्षिक स्वरुपात प्रत्येक गोष्ट केल्यामुळे योग्य काय किंवा अयोग्य काय या बाबतीत आपल्या शेतीतील निर्णय घेण्यास शेतकरी निर्णयक्षम बनत असल्यामुळे शेतकऱ्यांचा शेती शाळेला चांगला प्रतिसाद मोर्शी तालुक्यात मिळताना दिसत आहे.