Home महाराष्ट्र बौद्ध धम्मच का स्वीकारला?

बौद्ध धम्मच का स्वीकारला?

177

(कविश्रेष्ठ सुरेश भट निर्वाणदिन)

सुरेश भट यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्धधम्म स्वीकारला. भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांनी त्यांना धम्मदीक्षा दिली होती. ते नास्तिक होते. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे श्रद्धास्थान होते. बौद्ध धम्म हा ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा व डॉ.बाबासाहेबांचा धम्म आहे. त्यामुळे त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, असे मत त्यांचा मुलगा चित्तरंजन भट यांचे आहे. त्यांच्याविषयी अधिक चटपटीत माहिती वाचाच श्री कृ. गो. निकोडे- ‘कृगोनि’ यांच्या शब्दांत… 

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना गझलसम्राट असे आदराने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे दि.१५ एप्रिल १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीधरपंत भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलिओची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.

सुरेश भटांचा एक पाय दुर्बल झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देऊन बाकीचे शरीर मजबूत बनवले. याचा उपयोग त्यांना गाण्यातही झाला. ते तास न् तास मैफली करू शकत. ते दंडबैठका काढत असत, पण डबल बारवर शंभर ते दीडशे डिप्स मारत. त्यामुळे इतकी शक्ती पायात आली की ते सायकल चालवू लागले. वडिलांनी त्यांना मिलर कंपनीचा डायनोमा असलेली रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी दिली होती. सन १९६५मध्ये जेव्हा अमरावती रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल झाला तेव्हा अमरावतीतील सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढण चढत. पण सुरेश भट हे आपला भाऊ दिलीप यांना डबलसीट घेऊन एका दमात ती चढण चढत. ते हुतूतू, व्हॉलीबॉलही खेळत. ते आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप- शोभादर्शक आणि पेरिस्कोप- परिदर्शक सुद्धा बनवीत. काचा कुटून पतंगाचा मांजा बनविण्यात ते वाकबगार होते. त्यांना गुलेर- बेचकी किंवा गलोल बनविता येई. त्यांचा नेम अचूक असे. ते पाहून श्रीधरपंतांनी त्यांच्यासाठी खास अमेरिकन स्लिंग शॉट बंदूक आणली होती. ती वापरून भट चिमणी, कबुतर घायाळ करीत. ते भालाफेकही करीत. भालाफेकीचा सराव घराजवळच्या निंबाच्या झाडावर चाले तर तलवारबाजीचा प्रा.बाबा मोटे यांच्याबरोबर चालत असे. एका घावात दोन तुकडे करण्यात ते एक्सपर्ट होते.

शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्या स्वतः हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणाऱ्या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. त्यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एचएमव्हीचा एक ग्रामोफोन आणला होता. मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी ध्वनिमुद्रिका विकत आणत. ही संगीत आवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील गती पाहून त्यांच्या वडीलांनी त्यांना रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा घरी येऊ लागले. आजारी असताना ते तास न् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. ते स्वतः उत्तम गायक पण होते. त्यांचा गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत दि.२० फेब्रुवारी १९८४ रोजी झाला होता. त्यावेळी साथीसाठी पेटीवर हृदयनाथ मंगेशकर होते. अंथरुणावर बसून आणि पडून त्यांनी संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ हा ग्रंथ आणि विष्णू नारायण भातखंडेकृत संगीत खंड असे अनेक ग्रंथ त्यांनी त्याच काळात वाचले होते. त्यांनी गानसोपानची अनेक पारायणे केली होती. सन १९५२मध्ये त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तोही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत असत. त्यांना एक मुलगी विशाखा व दोन मुलगे हर्षवर्धन व चित्तरंजन होती. त्यापैकी हर्षवर्धन यांचा अपघातात मृत्यू झाला होता.

सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बीएला अंतिम वर्षात दोन वेळा नापास झाले. शेवटी सन १९५५ साली ते बीए पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. त्यांचे काही काव्यसंग्रह- एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्‍तरंग, सुरेश भट-निवडक कविता आणि गद्य- हिंडणारा सूर्य आदी आहेत.

कविश्रेष्ठ सुरेश भट हे गडचिरोली येथे भरलेल्या ३९व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. महाराष्ट्रातील नागपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दि.१४ मार्च २००३ रोजी वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे त्यांच्या पावन निर्वाणदिनी त्यांच्या अचाट साहित्य साधनेला मानाचा लवून मुजरा !!

✒️श्री कृ. गो. निकोडे- कृगोनि(मराठी साहित्यिक विदर्भ प्रदेश)द्वारा- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक.मु. रामनगर- गडचिरोली, जि. गडचिरोली.फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here