Home गडचिरोली वायदेभंगाची ही रंगपंचमी!

वायदेभंगाची ही रंगपंचमी!

137

(धूलिवंदन व रंगपंचमी विशेष)

आजकाल विविध प्रकारचे रंग व रसायने पाण्यात कालवून ते एकमेकांवर उडवितात. विशेषत: तरूण स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची व थट्टा-मस्करी करण्याची संधी या रंगपंचमी सणामुळे मिळते. उट्टे काढण्याच्या व बदला घेण्याच्या उद्देशाने असे उपद्व्याप योजले जातात. त्यात रूप- शरीर विद्रूप होऊन परिणामी जिवीत हानीसुद्धा होऊ शकते. परंतु सांगेल कोण अशा अल्लड व अतिशहाण्या लोकांना? अशी सत्यता समोर आणणारा हा लेख बापू- श्रीकृष्णदास निरंकारी यांच्या सुंदर शब्दलाघवातून… 

धूलिवंदन: होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरातील महिला पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. होळीच्या निखाऱ्याने व सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते, की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कैऱ्याही मिळू लागतात. कैऱ्या उकडून त्याचा गर लहान मुलांच्या अंगाला लावून त्यास स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात, अंगाला फासतात व नंतर स्नान करतात. याच सणाला धुळवड असेही म्हटले जाते. काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे. तरीही रंगपंचमी चित्रपटाचे गीत आपोआप ओठांवर उमटतेच-

“लेईन चोळी, सजेन खुप|
उरी-जिव्हारी तुमचे रूप||
शमेल लाही अंगाची, गं बाई अंगाची|
आली बाई पंचिम रंगाची||”

रंगपंचमी अर्थात फाल्गुन वद्य पंचमीच्या काळापर्यंत वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे या सुमारास झाडे नवीन पल्लवीने व विविध रंगी फुलांनी रंगीबेरंगी दिसत असतात. हवाही उष्ण झालेली असते. अशावेळी थंड पाणी अंगावर उडविणे सुखदायक असते. त्यामुळे रंगपंचमी हा सण सुरू झाला असावा. पळसाच्या फुलांपासून काढलेला रस तसेच केशराचे पाणी मिसळून ते एकमेकांच्या अंगावर उडविले जात असे. पेशवाईत तर हा सण शाही इतमामाने साजरा केला जात असे. रंगाच्या पिचकाऱ्या भरभरून हत्तीवरून गुलाल आणि इतर कोरड्या रंगाची उधळण केली जात असे. आजकाल विविध प्रकारचे रंग व रसायने पाण्यात कालवून ते एकमेकांवर उडवितात. विशेषत: तरूण स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची व थट्टा-मस्करी करण्याची संधी या रंगपंचमी सणामुळे मिळते. उट्टे काढण्याच्या व बदला घेण्याच्या उद्देशाने असे उपद्व्याप योजले जातात. त्यात रूप- शरीर विद्रूप होऊन परिणामी जिवीत हानीसुद्धा होऊ शकते. परंतु सांगेल कोण अशा अल्लड व अतिशहाण्या लोकांना? परत आजकाल एखाद्या हौदातील पाण्यात रंग टाकून एकमेकांना त्यात डुबवून हसत खेळत या सणाची मजा लुटली जाते, हे वाटल्यास चांगले. या सणासाठी विशेष असे पक्वान्न ठरलेले नाहीत, हे येथे अवश्यच सांगण्याजोगे! कारण-

“फाल्गुनातली राजस रात!
भिजुनी जाईल प्रीतरसात!!
जोडी कमळण भृंगाची, गं बाई दोघांची!
आली बाई पंचिम रंगाची!!”

रंगपंचमी: फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव आहे. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला रंगपंचमी हे नाव प्राप्त झाले आहे. या प्रसंगी विविध रंगांची चूर्णे पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविले जाते. रंग उडविण्याचा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी हा उत्सव निगडित असावा. धर्मसिंधू या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंद सोहळा साजरा केला जातो. हा उत्सव सद्या प्राकृत लोक वद्य पंचमीपर्यंत साजरा करतात, अशी माहितीही या ग्रंथाने दिली आहे. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते. सदर गीताच्या ओळी

उत्सवाचे महत्व सांगतात-
“आज पंचीम सण वर्षाचा;
पाऊस पाडा सूख हर्षाचा!
विसरा कामे विसरा रान;
नाचनाचता विसरा भान!
गुलाल-बुक्का मुखी माखा;
रंग फेका रंग रे, रंग फेकाऽऽऽ..!”

पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाळले होते. त्यानंतर त्याने अनंगरूपाने त्याला पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे, हा देखील या उत्सवामागचा हेतू असण्याची शक्यता आहे. पौर्णिमान्त मास मानण्याच्या पद्धतीमध्ये होळी पौर्णिमा ही वर्षाची अखेरची तिथी ठरल्यामुळे त्यानंतर नव्या वर्षाला प्रारंभ होतो. त्यानुसार रंगपंचमी हा नववर्षाच्या स्वागताचा उत्सवही असण्याची शक्यता आहे. जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट झाली असून आता नव्या सृष्टीचा उदय झाला आहे, असेही या आनंदोत्सवातून सूचित केले जात असावे. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी सासुरवाडीकडून जावयाचे जे बारा सण साजरे होतात, त्यांमध्ये रंगपंचमीचा अंतर्भाव आहे. त्या दिवशी नववधूला केशरी रंग उडविलेली नवी साडी सासरकडून मिळते. मराठ्यांच्या कारकीर्दीत सरदार वगैरे प्रतिष्ठित लोक रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करीत असत, असे शाहीर वगैरेंच्या वर्णनावरून दिसते. रंगपंचमीनिमित्त भरलेल्या दरबारात छोट्या जिजाईने पाच वर्षे वयाच्या शहाजी भोसले यांच्या अंगावर गुलाल उधळल्यामुळे त्यांचे पति-पत्नीचे नाते सूचित झाले होते. पुढे त्यांचा विवाह झाला, अशी वर्णने शाहिरांनी केली आहेत. काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी बगाड घेण्याची पद्धत आहे. आता आनंदाने गुणगुणा बरं-

“संक्रांतीला भेटू ऐसी केली होती बोली।
पुनव फाल्गुनी होऊन गेली, तेव्हा स्वारी आली।
अशा या वायदेभंगाची, आली बाई पंचिम रंगाची।।”

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे धुळवड व रंगपंचमी निमित्त सर्वांना रंगारंगांच्या हार्दिक शुभेच्छा !!

✒️बापू- श्रीकृष्णदास निरंकारी(लेखक व कविराज)प.पू.गुरूदेव हरदेव कृपानिवास- रामनगर, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here