🔸शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात !
🔹अर्थसंकल्पात संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी फक्त घोषणांचाच पाऊस !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.6मार्च):-होळी हा रंगांचा सण खरेतर हा आनंदाचा, उत्साहाचा दिवस, रंग उधळण्याचा दिवस, मनातील सर्व मलीनता दूर करून सप्तरंगात बुडून जाण्याचाच हा खरा दिवस. आजवर होळीची हीच व्याख्या होती, असे म्हणावे लागेल मात्र, आज परिस्थिती खरंच तशी आहे का? हा विचार करायला भाग पाडणारे वातावरण भोवताली आहे.
विदर्भातील प्रसिद्ध असलेला संत्रा विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणाऱ्या वरूड मोर्शी तालुक्यातील प्रमुख फळपीक संत्रा असून या संत्र्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मोर्शी वरूड तालुक्यात ४५ हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन घेतले जाते. परंतु एकूण उत्पादनाच्या ४० टक्के संत्रा आकाराने लहान असल्याने त्याला योग्य भाव मिळत नाही. परिणामी तो एकतर मातीमोल भावाने विकावा लागतो किंवा फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. प्रत्यक्षात असा संत्रा प्रक्रियेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा आहे. दुर्दैवाने विदर्भात एकही संत्रा प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादक दरवर्षी त्याच त्याच समस्यांना तोंड देत आहेत.
आंबिया व मृग बहाराला अत्यल्प भाव मिळत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे मार्च महिना येऊन सुद्धा संत्रा झाडालाच लटकलेला आहे .संत्रा पिकाचे र्सवकष धोरण अस्तित्वात नसल्यामुळे प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी आहे. एकेकाळी विदर्भात संत्रा मुबलक प्रमाणात निघत होता. परंतु, राज्य सरकारपाशी र्सवकष संत्रा धोरण नसल्याने स्थिती हाताबाहेर चालली आहे. डिंक्या, कोळशीचा प्रादुर्भाव, तंत्रज्ञानाचा नैसर्गिक आपत्तीचा विळखा, सिंचनाचे नगण्य प्रमाण, एकही प्रक्रिया उद्योग नसणे, निर्यातशून्य धोरण, सदोष फळपीक विमा अशी असंख्य कारणे यासाठी जबाबदार आहेत .
विदर्भात एवढ्या वर्षांत आज पर्यंत एकही यशस्वी संत्रा प्रक्रिया प्रकल्प सरकारला उभारता आला नाही. तारीख पे तारीख बघा १९५७, १९६३, १९९२, १९९५, २०१४, २०१७, २०१९. आता २०२१ च्या अर्थसंकल्पातील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा म्हणजेही एकप्रकारे तारीखच दिली गेली. या तारखा नि घोषणा कधीच फळाला आल्या नाहीत. काही प्रकल्प सुरू होण्याच्या आधीच सुपडासाफ झाले. तर काही हवेतल्या हवेतच गायब. २०१४ ला इथल्यासाठी जाहीर झालेला प्रकल्प नांदेडच्या नेत्यांनी पळवला. तो तिथे व्यवस्थित सुरू आहे. इथून तिथे संत्री नेतो म्हटले तर बोकांडी बसणारा अतिरिक्त भार पेलण्याची क्षमता शेतकऱ्यांत नाही. ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्यांना आता शेतकऱ्यांनी त्यांचा ‘ढाई किलोका हाथ’ दाखविणे गरजेचे झाले आहे.
एकेवेळी भारताच्या अर्थकारणात शेतकऱ्यांना पाठीचा कणा म्हणून संबोधले जात होते परंतु या लोकशाही प्रधान देशात आता शेतकऱ्यां ऐवजी व्यापारी व नोकर शहांचा बोलबाला वाढत चालला आहे. शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या डोंगराखाली सापडुन हतबल होऊ लागला आहे . दिवसेंदिवस शेती हा व्यवसाय तोट्याचा ठरू लागला आहे शेती व्यवसाया मधे शेतकरी तारेल असे दिसून येत नाही .
गेल्या काही वर्षांपासून कमी होणाऱ्या पावसाळ्यामुळे पाणीटंचाई, नापिकी, दुष्काळ वादळी पाऊस, गारपिट, शेती पिकांवर येणारे रोग, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, यामुळे नापिकी, पाणीटंचाई, या सर्व प्रकाराला कंटाळून वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांनी या रंगाचा बेरंग झाला आहे. खेड्यापाड्यातील भीषण वातावरणाचा रंग चढल्याने शेतकरी, शेतमजुरांच्या आयुष्यातील खरे रंगच नाहीसे झाले आहेत. किंबहुना गरिबी, कुपोषण, महागाई या रंगात रंगलेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या वास्तवाचा भयाण रंग अन्य कुठल्याही रंगाने झाकल्या जाणार नाही अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागात रोजच्या जीवनाची होणारी होळीच परिचयाची आहे. आता समाजातील प्रत्येक घटकानेच याविरुद्ध एकत्र येऊन काही काम करण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातील होळीचे रंग पूर्ववत् होण्याची आशा आहे. वाढत्या महागाईच्य दुष्टचक्रात सापडलेल्या ग्रामीण भागाला धुळवडीचेही अप्रूप नाही. होळीसाठी हवी असते जगण्याची उमेद. मात्र, ग्रामीण भागात भविष्याच्या आशेचा किरण दिसत नसल्याने उद्विग्न मन:स्थिती सर्वत्र आहे.
[ ]
‘नागपुरी संत्रा’ म्हणून खूप गाजावाजा केला जातो. परंतु ‘नागपुरी संत्रा’ खराखुरा मोर्शी आणि वरुड या पट्टयात होतो. हा परिसर संत्र्यांच्या उत्पादनात अव्वल आहे. त्यामुळे या परिसराचा गुणगौरव ‘कॅलिफोर्निया’ म्हणून खूपदा केला जातो. परंतु नेते फक्त गुणगौरव करण्यासाठी तोंड उघडतात. संत्रा उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्या मुस्काटांना आपोआप कुलूप लागते. संत्रा उत्पादकांसाठी आम्ही अमूक करू, ढमूक करू म्हणून इलेक्शनपुरती घोषणाबाजी करतात. एकदाचे आमदार-खासदार-मंत्री झाले की संत्रा सडू द्या नाहीतर शेतकरी मरू द्या त्यांना काहीच सोयरसुतक नसते. फक्त घोषणाबाजी करण्यात ते वस्ताद असतात. — रुपेश वाळके प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी मोर्शी .