Home महाराष्ट्र युवकाचा पोलीस स्टेशनमध्ये पेट्रोल टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न-मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई न...

युवकाचा पोलीस स्टेशनमध्ये पेट्रोल टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न-मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल!

141

✒️किशोर राऊत(महागाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9011649037

महागाव(दि.1मार्च):-तालुका प्रतिनिधी किशोर राऊत महागाव -अवैध धंद्यांची तक्रार का केली म्हणुन तक्रारकर्त्या युवकास मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाईची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी केली होती. परंतु जिल्हा पोलीस अधिक्षकांनी कोणतीही कारवाई न केल्याने पीडित युवकाने चक्क पोलीस स्टेशनमध्ये अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता.०१) रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान महागाव येथे घडली.

महागाव तालुक्यातील कलगाव येथील समाधान राऊत या युवकाने अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी तक्रार दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी महागाव पोलिस स्टेशनला दिली होती. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२३ रोजी आपल्या तक्रारीवर कारवाई का केली जात नाही याची चौकशी करण्यासाठी महागाव पोलीस स्टेशनमध्ये आला असता त्यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी राऊत याला अवैध धंद्याची तक्रार का केली याचा जाब विचारत अश्लिल भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.

त्यामुळे झालेल्या प्रकाराने मानसिक व शारीरिक त्रास सहन करून पीडित युवकाने या सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदन सादर करून कारवाई न झाल्यास १ मार्च रोजी महागाव पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहन करण्याचा ईशारा दिला होता. पोलीस प्रशासनाकडून या युवकांच्या इशाऱ्याला गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केल्याने उद्विग्न झालेल्या समाधान राऊत या युवकाने बुधवारी (ता. ०१) रोजी सकाळी ११ वाजता पेट्रोलची बॉटल सोबत घेवुन महागाव पोलीस स्टेशन गाठले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यांकडून पेट्रोलची बॉटल हिसकावून घेतली व त्याची समजुत काढत असतांनाच कर्मचाऱ्यांची नजर चुकवुन त्याने बाजुला ठेवलेली पेट्रोलची बॉटल घेवुन अंगावर पेट्रोल ओतुन घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु त्याठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. महागाव पोलिसांनी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले. हा प्रकार घडला तेव्हा पोलीस स्टेशनला एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. हा घडलेला प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांना कळल्यानंतर त्यांनी पिडीत युवकासोबत फोनवर चर्चा करून संयम राखण्याचे आवाहन केले असल्याची माहिती आहे.

कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करू !

महागाव येथे घडलेला प्रकार दुर्दैवी असुन आपण प्रकरणाची पुर्ण व सखोल माहिती घेवुन पुढील दिशा ठरवु जेणे करून कोणावरही अन्याय होणार नाही याकडे लक्ष घालुन न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करू- नामदेवराव ससाणे, आमदार, उमरखेड – महागांव विधानसभा.


चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई केल्या जाईल !

महागाव पोलीस स्टेशनमध्ये जो प्रकार घडला त्याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी केल्या जाईल व तो अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील.- प्रदिप पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड.
—-

प्रभारी अधिकारी न देता कायमस्वरुपी अधिकारी द्यावा !

घडलेला हा प्रकार निंदनीय असून प्रभारी अधिकाऱ्याचे महागाव तालुक्यात अंकुश नसल्याने बेलगाम बेताल तालुका झालेला आहे. त्यामुळे प्रभारी ठाणेदार न देता कायमस्वरुपी ठाणेदार द्यावा. सक्षम अधिकारी नसल्यामुळे निर्णय घेतल्या जात नाहीत त्यामुळे इथे सक्षम अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे.- जगदीश नरवाडे, संस्थापक अध्यक्ष
जन आंदोलन आधार संघर्ष आधार समिती.

—-
आत्मदहनाचा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ठाणेदाराचा पत्रकारांवर दबाव !

सदर घटनेची माहिती पत्रकारांना मिळाली. त्यामुळे पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी ठाण्यात पोहचले. त्यावेळी पोलिसांसोबत पत्रकारांनी समाधान राऊत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आत्मदहन करण्यावर ठाम असलेल्या समाधान राऊत याने पोलिसांनी ताब्यात घेतलेली पेट्रोल बॉटल अंगावर टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.पोलिसांसोबत पत्रकारांनी त्याला धरले. या घटनेचा व्हिडिओ पत्रकारांनी वृत्तसंकलन करण्यासाठी घेतला. परंतु हा व्हिडीओ पत्रकारांनी डिलीट करण्याची ठाणेदारांनी दबाब टाकला. अन्यथा कार्यवाही करण्याची धमकी वजा इशारा दिला. त्यामुळे पत्रकारांनी ठाणेदार यांच्याविरोधात रोष व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here