🔹एकमेकांची केली तोंडभरुन स्तुती : भरघोस निधी मंजूर
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.25फेब्रुवारी):-शहरातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ प्रांगणात जिल्ह्यातील प्रमुख महत्त्वकांक्षी रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरण, पूल बांधणी, रिंग रोडसह इतर विविध विकास कामांचा भूमीपूजन व कोनशिला अनावरण, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मंत्री गडकरी व गंगाखेडचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यातली जवळीकता आणि मैत्रीचा अनुभव उपस्थित सर्व परभणीकरांना आला.अतिशय भव्य स्वरुपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंत्री गडकरी आणि आ.डॉ.गुट्टे यांच्या आपुलकीचा संवाद झाला. व्यासपीठावर शेजारी बसवून मंत्री गडकरी यांनी आ.डॉ.गुट्टेंशी मनमोकळा संवाद साधला. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून बोलताना दोघांनीही एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. त्यास उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.
याप्रसंगी बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, देशाच्या विकासात गडकरी साहेबांचे मोठे योगदान आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जागतिक दर्जाचे रस्ते उभारणी करणाऱ्या गडकरी साहेबांची जगभरात वेगळी ओळख आहे. आमच्या गंगाखेड विधानसभेसाठी आजपर्यंत गडकरी साहेबांनी भरभरुन निधी व प्रेम दिले आहे. तरीही गंगाखेड ते लोहा रस्ता, गंगाखेड ते परभणी रस्त्यावर म्हणजे गोदावरी नदीवर नवीन पुल बांधणी यासह इतर काही रस्ते मंजूर करुन सर्वसामान्य लोकांना आधार द्यावा, अशी अपेक्षा आहे.
त्यावर बोलताना मंत्री नितीन गडकरी यांनी गंगाखेड विधानसभेच्या कार्यक्षेत्रातील इसाद ते किनगाव २७ किलोमीटर रस्त्यासाठी १२५ कोटी, गंगाखेड ते लोहा ४५ किलोमीटर रस्त्यासाठी ५०० कोटी, गंगाखेड ते परभणी रस्त्यावर म्हणजे गोदावरी नदीवर पूल बांधणीसाठी १५० कोटी आणि गंगाखेड शहरातील वाहतूक कोंडी दूर करणारा गंगाखेड शहर बाह्य वळण रस्ता (बायपास) भूसंपादनासह मंजुरी आणि गंगाखेड तहसील कार्यालया जवळील रेल्वे फाटक क्र. १७ वर आरओबी अर्थात रेल्वे ओव्हर ब्रीज भुयारी मार्गासह असे विविध लोकोपयोगी विकास कामांसाठी जागेवर मंजूरी देऊन गुट्टे व गडकरी मैत्रीवर शिक्कामोर्तब केले. तसेच दोघांच्या सौहार्दपूर्ण संबंधावर प्रकाश टाकला.
दरम्यान, आ.डॉ.गुट्टेंची राजकारणात येण्यापूर्वी यशस्वी उद्योजक म्हणून ख्याती होती. त्यामुळे सर्व पक्षात त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच जिव्हाळ्याचे संबंध केंद्रीय मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुध्दा आहेत. त्यामुळे विकास कामांसाठी हक्काने निधी मागण्यांसाठी आ.डॉ.गुट्टे गडकरी यांना मुंबई, नागपूर आणि दिल्लीतही भेटत असतात. दोघातली मैत्रीमुळे गडकरी यांनी आ.डॉ.गुट्टेंना निधीच्या बाबतीत कधीही निराश केले नाही. त्यामुळे गंगाखेड विधानसभेच्या रस्त्यांची चांगलीच ‘समृध्दी’ झाली आहे.
यावेळी खा.संजय जाधव, आ.सुरेश वरपुडकर, आ.मेघनाताई बोर्डीकर, आ.डॉ.राहुल पाटील, आ.विप्लव बजोरिया, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ.सुरेशदादा देशमुख, जिल्हाधिकारी आंचल गोयल, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.इंद्रमणी, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे, जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, मित्र मंडळाचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, प्रभारी माधव गायकवाड, सरचिटणीस रवि कांबळे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, गणेश कदम, बालासाहेब रोकडे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, संजय पारवे, राजु खान यांच्यासह गुट्टे काका मित्रमंडळ,रासप व विविध पक्ष व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, पत्रकार, कार्यकर्ते, अधिकारी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*गुट्टे साहाब तुम आगे बढो…*
याप्रसंगी भाषणासाठी आ.डॉ.गुट्टे यांच्या नावाची उदघोषणा होताच ‘गुट्टे साहाब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘कोण आला रे कोण आला? गंगाखेडचा वाघ आला’ आणि ‘एकच साहेब गुट्टे साहेब’ या घोषणांनी अख्खा परिसर दणाणून गेला होता. अखेर आ.डॉ.गुट्टेंनी हात उंचावला आणि समर्थकांनी घोषणा थांबविल्या. मात्र, ‘त्या’ घोषणांची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.
आ.गुट्टे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन…
आ.डॉ.गुट्टे आणि मंत्री गडकरी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे गावखेड्यात बोलताना आ.डॉ.गुट्टे नेहमी मंत्री गडकरी यांच्या कामाचे व स्वभावाचे स्तुति करतात. परिणामी, कार्यकर्ते सुध्दा गडकरी प्रेमी झाले आहेत. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांचा जनसंपर्क दाखविणे आणि गडकरी यांना पाहाणे व ऐकणे यासाठी आ.डॉ.गुट्टे समर्थकांनी गंगाखेड ते परभणी जवळपास ५०० पेक्षा अधिक चारचाकी गाड्यांची रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे कार्यक्रम स्थळी सर्वत्र गुट्टे समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली.
गंगाखेड धारखेड पुलाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर गंगाखेड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत भेडसावत होता. शहरातील वाहतूक कोंडी सोडविणे महत्त्वाचे होते. गंगाखेड बाह्य वळण रस्ता भूसंपादनासह करण्यास केंद्रीय मंत्री मा.ना. गडकरी साहेबांनी मंजुरी दिल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार असून शहरातील रहिवाशांसह शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील तहसील कार्यालया जवळील रेल्वे गेट क्र. १७ वर १४० कोटी रुपये निधी खर्च करून रेल्वे ब्रिज भुयारी मार्गासह बांधकामास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सततच्या बंद रेल्वे फाटकापासून नागरिकांची सुटका होणार आहे. यासह गंगाखेड ते लोहा राष्ट्रीय महामार्गास ५०० कोटी, परभणी ते गंगाखेड महामार्गावरील गोदावरी नदीवरील पूल बांधकामास १५० कोटी, इसाद,पिंपळदरी ते किनगाव राष्ट्रीय महामार्गास १२५ कोटी रुपये निधीस मा. ना. गडकरी साहेबांनी मंजुरी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून ॠण व्यक्त करतो.
आ.डॉ. रत्नाकर गुट्टे