[अवतार मेहरबाबा जयंती विशेष]
दि.१० जुलै १९२५पासून आपल्या जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत मेहेरबाबांनी मौन धारण केले. आपले अनुयायी आणि अन्य लोक यांच्याशी त्यांनी हातवारे करून तसेच फलकावर शब्दांचा उपयोग करून संवाद साधला. जाती-धर्माचा भेद न बाळगता मेहेरबाबांनी गरीब, मानसिक आजार आणि संसार तापांनी त्रस्त रुग्णांसाठी आश्रम, शाळा व दवाखाने हे विनामूल्य सुरु केले होते. चला तर मग, जयंतीनिमित्त जाणून घेऊया मेहेरबाबा यांच्या जीवनाचे पावन चरित्र श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी यांच्या शब्दांत… संपादक.
हजरत बाबाजान या आध्यात्मिक महिलेशी भेट झाल्यांनतर मेहेरबाबा यांनी अन्य चार महान सद्गुरुंशी संपर्क साधला. त्यात ताजुद्दीन बाबा, नारायण महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि उपासना महाराज यांचा समावेश होता. मेहेरबाबा यांच्यानुसार हे पाच गुरुश्रेष्ठ होते, की ज्यांच्यात ईश्वर साक्षात्कार प्राप्त आत्मा होता. त्यांनतर मेहेरबाबांनी कॉस्मोपॉलिटन क्लबची स्थापना केली, जे जगातील धर्मादाय संस्थांना पैसे देण्यास समर्पित होते.
मेहेरबाबा हे बहुवाद्य वादक आणि कवी देखील होते. बऱ्याच भाषांमध्ये ते अस्खलितपणे बोलत. त्यांना विशेषतः शेक्सपियर आणि हाफिज यांच्या कविता फार आवडत असत. इ.स.१९२२मध्ये मेहेरबाबा आणि त्यांच्या अनुयायांनी बॉम्बे- आताचे मुंबई येथे मंजिल-ए-मीम-हाऊस ऑफ मास्टरची स्थापना केली. तेथे बाबांनी कठोर शिस्त आणि त्यांच्या शिष्यांना आज्ञाधारकता मागणी करण्याची प्रथा प्रारंभ केली. एका वर्षांनंतर बाबा आणि त्यांची मंडळी अहमदनगर जवळील एका ठिकाणी गेले. ज्याचे नाव त्यांनी मेहेराबाद- आशीर्वादांचा बाग असे ठेवले. सन १९२०च्या दशकात बाबांचे हे आश्रम त्यांच्या कामाचे केंद्र बनले. पुढे मेहेराबादमध्ये त्यांनी शाळा व दवाखाना उघडले. ते त्यांनी सर्व जाती-धर्मांसाठी विनामूल्य खुले केले होते.
अवतार मेहेरबाबा यांचा जन्म दि.२५ फेब्रुवारी १८९४ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एका झोरास्ट्रियन कुटुंबात झाला. मेहेरबाबा यांचे मूळ नाव मेरवान शेरियार इराणी असे होते. सुरुवातीच्या काळात त्यांची आई व वडील इराणमध्ये राहायचे, नंतर ते भारतात स्थलांतरित झाले. त्यांचे वडील हे परमेश्वराचे अस्सल साधक होते. अध्यात्म श्रेणीरचनाद्वारे त्यांना सांगण्यात आले होते, की साक्षात्कार होऊन देव त्यांच्या पुत्ररूपात त्यांच्याकडे येईल. यासोबतच जन्म झाला तो म्हणजे एका महान अध्यात्मिक गुरु अवतार मेहेरबाबांचा. जन्मानंतर मेहेरबाबांनी आपले शालेय शिक्षण ख्रिश्चन हायस्कूलमध्ये केले असून डेक्कन कॉलेज मधून उच्च शिक्षण प्राप्त केले होते. डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतांना मेहेरबाबा यांची भेट हजरत बाबाजान म्हणजे एका अफगाणिस्थानी वृद्ध महिलेशी झाली. जी पुण्यातील एका रोडवर असलेल्या निंबाच्या झाडाखाली रहायची.
त्याकाळात हजरत बाबाजान यांची अध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्धी होती. मेहेरबाबा यांच्यानुसार हजरत बाबाजान या ईश्वर साक्षात्कार प्राप्त आत्मा होत्या. त्या पाच महान सद्गुरुंपैकी एक होत्या. हजरत बाबाजान यांनी मेहेरबाबा यांच्या कपाळाचे चुंबन घेऊन त्यांच्या मनात आध्यात्मिक प्रवृत्ती जागृत केली होती.
मेरवान शेरियार इराणी अर्थातच अवतार मेहेरबाबा हे भारतातील गूढवादी, धार्मिक आणि अध्यात्मिक गुरु होते. वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी घोषित केले, की ते या युगातील अवतार आहेत. अवतार म्हणजेच स्वर्गात राहत असणारे देव पृथ्वीवर मनुष्याचा जन्म घेतात. दि.१० जुलै १९२५पासून आपल्या जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत मेहेरबाबांनी मौन धारण केले. आपले अनुयायी आणि अन्य लोक यांच्याशी त्यांनी हातवारे करून तसेच फलकावर शब्दांचा उपयोग करून संवाद साधला. जाती-धर्माचा भेद न बाळगता मेहेरबाबांनी गरीब, मानसिक आजार आणि संसार तापांनी त्रस्त रुग्णांसाठी आश्रम, शाळा व दवाखाने हे विनामूल्य सुरु केले होते. जुलै १९२५मध्ये धारण केलेल्या मौनी वृत्तीप्रमाणे मेहेरबाबा हे आपल्या जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत शांत राहिले. दि.३१ जानेवारी १९६९ रोजी या महान गूढवादी आणि अध्यात्मिक गुरुचे निधन झाले.
!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे पावन जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!
✒️अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com