🔸वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
🔹नागपुरात वन विकास महामंडळाचा विभागीय क्रीडा स्पर्धेचा,पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
नागपूर(दि.23फेब्रुवारी):-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात केली.
वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौर, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, विभागीय व्यवस्थापक ए. आर. प्रवीण, नागपूरचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा आदी उपस्थित होते.
पुरस्कार वितरणानंतर बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, क्रीडा स्पर्धा व्यक्तीमधील निकोपतेला चालना देते. वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांनी ही निकोपता कर्मचाऱ्यांना शिकवली आहे. लवकरच वन विभागाच्या आणि वन विभाग विरुद्ध वन विकास महामंडळ अशा विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. एफडीसीएम केवळ वन क्षेत्राच्या विकासासाठीच काम करीत नाही तर वन विभागातील कर्मचाऱ्यांना एखाद्या कुटुंबाप्रमाणे मानत त्यांच्याही सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करीत आहे. एफडीसीएम केवळ एक महामंडळ नसून एखाद्या कुटुंबासारखे आहे. वन विकास महामंडळातील खेळाडूंनी सर्वच स्पर्धांमध्ये यश मिळावावे. वन विकास महामंडळातील खेळाडूंचे कौतुक यासाठी करावे लागेल की विदर्भातील उष्णतामान जास्त असतानाही ते मैदानी खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत आहेत. एफडीसीएमच्या खेळाडूंचा चपळता व कार्यकर्तृत्वाच्या बाबतीत चित्ता असा उल्लेख करीत ना. मुनगंटीवार यांनी उपस्थित खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करायचे असेल तर शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्वाचे आहे. खेळांसोबत सांस्कृतिक कार्यक्रम देखील महत्वाचे आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने सांस्कृतिक महोत्सव देखील घ्यावे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. राज्यातच नव्हे तर देशात वन हे एक नंबरला कायम ठेवण्याचे मोठे आव्हान सर्वांपुढे आहे.
—
राज्यातील वनक्षेत्रात मोठी वाढ
महाराष्ट्रातील वन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नुकत्यात आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. २ हजार ५५० वर्ग किलोमीटरचे वनक्षेत्र महाराष्ट्रात वाढले आहे. मँग्रेाजमध्येही १०२ वर्ग किलोमीटरची वाढ झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मँग्रोजची संकल्पना देशभरात राबविण्याची घोषणा केली, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमात गौरवाने नमूद केले.