Home महाराष्ट्र जातीयवादी संघटनांच्या आडून बार्टीत ‘उजव्यां’चा शिरकाव?

जातीयवादी संघटनांच्या आडून बार्टीत ‘उजव्यां’चा शिरकाव?

185

🔸डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य फुटिरतावादी असल्याचा जावईशोध

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.21फेब्रुवारी):- सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमधील जातीयवाद विकोपाला गेला आहे. बौद्ध अधिकारी संस्थेत उजव्या विचारसरणीचा शिरकाव करून देत नाही म्हणून त्यांच्यावर विविध आरोप करून पद मुक्तीसाठी आंदोलन करण्याचा घाट काही जातीय संघटनांनी घातला आहे. सामाजिक समरसता अनुसूचित जाती संदर्भातील सूचना नावाचे १३ पानी सूचनापत्र काही जातीयवाद्यांना काढले असून यात बाबासाहेबांच्या साहित्याला फुटीरतावादी साहित्य ठरवून ते प्रकाशित करून नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बार्टीतील जातीय संघटनांचे राजकारण हे विकासासाठी नाही तर उजव्या विचारसरणीला पोषक वातावरण तयार करण्यासाठी असल्याचे दिसून येते.

गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्यावर विविध आरोप करून वेगवेगळ्या प्रकरणात गोवण्यासाठी एका समाजाची जातीयवादी आणि उजव्या विचारसरणीची गुलाम संघटना कार्यरत असल्याचे दिसून येते. आपल्या समाजावर कसा अन्याय झाला असे रडगाणे गाऊन बौद्ध समाजाविरोधात अनुसूचित जातींमधील इतर घटकांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता बार्टीमधील एक भ्रष्ट अधिकारी त्यांना सहकार्य करीत असून यासाठी मोठी आर्थिक रसद पुरवीत असल्याची चर्चा आहे. निविदा काढताना संस्थाना दिलेल्या झुकावातून मोठा निधी गोळा करून तो निधी आता जातीयवादी संघटनांच्या माध्यमातून बार्टीच्या महासंचालकांना हटविण्यासाठी लावीत असल्याची चर्चा आहे.

याकरिता गावागावांतील भोळ्याभाबड्या समाजबांधवांना आपले भ्रष्ट दुखणे सांगून दिशाभूल करून भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता काही दलालांना हाताशी धरून आंदोलन करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याला फारसे यश आले नाही. त्यामुळे नागिणीसारखी चवताळलेल्या त्या अधिकाऱ्याने आता उजव्या विचारसरणीच्या पदाधिकाऱ्यांना शरण जाऊन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता बार्टीमधील प्रशासनच उजव्यांच्या दावणीला बांधून बार्टी बंद करण्याचा घाट घातला आहे. याकरिता काही माथेफिरू लोकांना हाताशी धरून सामाजिक समरसता अनुसूचित जातीसंदर्भातील सूचना नावाचे १३ पानाची पीडीएफ पुस्तिका काढली आहे. ती सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये अनुसूचित जातींमधील विकासाचा जाहीरनामा नसून बार्टी कशी बंद करता येईल, याच्या मार्गदर्शक सूचना सांगितल्या आहेत. बार्टीवर डाव्या विचारसरणीच्या लोकांचा ताबा असल्याचा आरोप केला.

काही उजव्या विचारसरणीच्या लोकांचे साहित्य प्रकाशित करण्याचा आग्रह धरणा असून काही फुटीरतावादी साहित्य प्रकाशित करण्यात येत असल्याचा माथेफिरूपणा केला आहे. बार्टीच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित साहित्याचे प्रकाशन करण्यात येते. त्याच साहित्याला फुटीरतावादी साहित्य म्हणण्याचा उपद्व्याप त्यांनी केला आहे.

समाजातील भोळ्याभाबड्या लोकांच्या भावनेशी खेळून त्यांची दिशाभूल करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे ‘हम चले बौद्ध की और’ असा नारा देत बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे उजव्या विचारसरणीसोबत स्वतःला गहाण ठेऊन समाजातील लोकांची दिशाभूल करून त्यांना विनाशाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

…तर बौद्ध समाज उतरेल रस्त्यावर-
आंबेडकरी साहित्याला फुटिरतावादी साहित्य म्हणण्यापर्यंत जातीयवादी संघटनेची मजल गेली आहे. फक्त आपल्या समाजावर अन्याय होतो हे सांगून स्वःसमाजाची दिशाभूल करून त्यांना विकासाच्या मार्गावर न नेता खडतर मार्गावर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंबेडकरी बौद्ध समाज समताधिष्ठित आहे. सर्वांना घेऊन चालणारा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याला फुटीरतावादी साहित्य म्हटले तर रस्त्यावर उतरून जातीयवादी संघटनांचा चोप येईल, अशा इशाराही समाजातील कार्यकर्त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here