🔹छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात केली घोषणा
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी,चिमुर)मो:-८६०५५९२८३०
चिमूर(दि.20फेब्रुवारी):- स्वातंत्र्य चळवळीत चिमुरचे योगदानाचा इतिहास हा महान आहे. चिमुर आणि क्रांती हे शब्द समान अर्थाने वापरले जातात. मात्र या क्रांती नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नसणे ही खेदजनक बाब आहे. २०२४ च्या शिवजयंतीचे आत आपल्या स्वखर्चातून चिमूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार अशी क्रांतीकारी घोषणा कांग्रेसचे नेते दिवाकर निकुरे यांनी केली. त्यांच्या या घोषणेला चिमूरकरांनी प्रचंड टाळयाच्या गजरात प्रतिसाद दिला.
शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजीत शिवजयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून दिवाकर निकुरे बोलत होते. यावेळी विचार मंचावर माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, शिव व्याख्याते इंजिनिअर अहमद पापाभाई शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी (ओबीसी)चे प्रदेश संघटक धनराज मुंगले, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस गजानन बुटके, नागभीड पंचायत समितीचे माजी सभापती प्रफुल खापरडे, कृष्णाजी तपासे, राजु लोणारे, अल्पसंख्यांक कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष जावा भाई, माजी नगर सेवक उमेश हिंगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष चुनीलाल कुडवे, प्रा. संजय पिठाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या छोटेखानी भाषणात चिमुर विधानसभा क्षेत्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेवून कार्यकत्यांना नव्या जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या. शिव जयंतीच्या शुभेच्छा देवून कार्यक्रम अर्धवट सोडुन पुढील कार्यक्रमाकरीता निघुन गेले.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदुचे दैवत नसून ते समस्त बहुजन समाजाचे प्रेरणास्थान असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकशाही मुल्य रुजविण्याचा प्रयत्न केला. शिवजयंती हि डिजेच्या तालावर नाचून साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार आपल्या डोक्यात घेवून त्याप्रमाणे आचरण करावे असे सांगत इंजिनिअर अहेमद पापाभाई शेख पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारासोबत फुले-आंबेडकरी विचार सोबत घेतल्यास समता प्रस्थापित होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येय धोरणानुसार भविष्यातील वाटचाल करण्याकरीता प्राधान्यक्रमाने युवकांनी पुढे यावे असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन सुधीर पोहनकर यांनी केले. कार्यक्रमाचे पूर्वी दिवाकर निकुरे यांचे मार्गदर्शनात गजानन बुटके व मित्र परिवाराचे नेतृत्वात शिवजयंती निमित्य चिमूर शहरात भव्य मिरवणुक काढण्यात आली.