(सद्गुरु रामकृष्ण परमहंस जयंती उत्सव विशेष)
प्रस्तुत लेख हा सद्गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक, तांत्रिक, वैष्णव, आणि भक्तिमय जीवनाचा परिचय करून देतो. रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या पूर्ण जीवनात भक्ती, ज्ञान आणि धर्म प्रसार केला. सद्गुरुदेव रामकृष्णजींचा सर्व धर्मीयांसाठी उपदेश- “जतो मत, ततो पथ- जितकी मते, तितके पंथ” हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे. परमहंसांचे पुढील उद्गार प्रसिद्ध आहे- “माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक, हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणती गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणती कृष्ण, कोणी म्हणती शिव, कोणी म्हणती ब्रह्म. तळ्यात पाणी असते परंतु कोणी त्याला पाणी म्हणतो, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान पानी म्हणतात, पण वस्तू एकच असते. एकेका धर्माचे एकेक मत असते, एकेक पथ असतो, परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी. जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते.” ही उद्बोधक माहिती अवश्यच वाचा, बापू- श्रीकृष्णदास निरंकारीजींच्या शब्दात…
रामकृष्ण परमहंस- पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात. ते ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णव ब्राह्मण परिवारात जन्मले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले. त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली आराधना सुरू केली. त्यांच्या आरंभीच्या काही प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंमध्ये भैरवी ब्राह्मणी या साध्वीचा समावेश होतो. तंत्र व वैष्णव भक्तीमध्ये भैरवीला गती होती. नंतर परमहंसांच्या म्हणण्यानुसार एका अद्वैत वेदान्तीच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निर्विकल्प समाधी अनुभवता आली. त्यांनी इतर धर्मांबाबतही, विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्माबाबत प्रयोग केले आणि हे सर्व धर्म एकाच ईश्वराकडे घेऊन जातात, असे म्हटले. ग्रामीण बंगाली भाषेतील छोट्या छोट्या कथांचा तेथील जनतेवर बराच प्रभाव पडला.
त्यामुळे रूढार्थाने अशिक्षित असतानाही रामकृष्ण परमहंस हे बंगाली विद्बज्जन समाजाचे व शिक्षित मध्यमवर्गाचे लक्ष वेधण्यास यशस्वी ठरले. सन १८७०च्या दशकाच्या मध्यापासून पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या बुद्धिजीवींवर त्यांचा प्रभाव पडला व नंतर ते बंगालमधील हिंदू प्रबोधनाचे उद्गाते ठरले. सद्गुरुदेव रामकृष्णजींचा सर्व धर्मीयांसाठी उपदेश- “जतो मत, ततो पथ- जितकी मते, तितके पंथ” हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे. परमहंसांचे पुढील उद्गार प्रसिद्ध आहे- “माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक, हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणती गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणती कृष्ण, कोणी म्हणती शिव, कोणी म्हणती ब्रह्म. तळ्यात पाणी असते परंतु कोणी त्याला पाणी म्हणतो, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान पानी म्हणतात, पण वस्तू एकच असते. एकेका धर्माचे एकेक मत असते, एकेक पथ असतो, परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी. जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते.”
रामकृष्ण परमहंस यांचे खरे नाव गदाधर चट्टोपाध्याय होते. त्यांचा जन्म दि.१८ फेब्रुवारी १८३६ रोजी कामारपुकुर, पश्चिम बंगाल येथे एका गरीब वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला. ते एकोणिसाव्या शतकातील एक गूढवादी आध्यात्मिक सत्पुरुष आणि सद्गुरु होते. ते खऱ्या अर्थाने जगविख्यात बनले, ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे गुरू म्हणून! परमहंसदेव यांना त्यांचे सर्व शिष्य आणि आप्तेष्ट हे ईश्वरी अवतार मानत असत. सुरुवातीच्या जीवनात रामकृष्ण हे काली भक्त म्हणून प्रसिद्ध होते. भक्ती आणि गूढता यांत ते पारंगत होतेच, परंतु ती केवळ भावना होती. त्यांना देवी काली खरोखर दर्शन देत असे. ऊर्जा आणि भावना यांचा खऱ्या अर्थाने जम बसवण्यात ते कुशल बनले होते. तंत्र आणि वैष्णव भक्ती यांत त्यांना परमानंद जाणवत होता. परंतु एक दिवस तोताराम या सत्य जाणणाऱ्या महापुरुषाने त्यांना सत्य आणि कल्पना यातील फरक समजावून दिला. त्या दिवसानंतर रामकृष्ण खऱ्या अर्थाने धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभवाला प्राप्त झाले.
रामकृष्णजी हे अशिक्षित असल्याने त्यांची बोलीभाषा ग्रामीण होती; परंतु आध्यात्मिक अनुभवामुळे त्यांची वाणी सुमधुर आणि रसाळ होती. त्यांच्या कथांचा आणि व्याख्यानाचा बंगाली जनतेवर विलक्षण प्रभाव दिसून येत होता. अनेक तार्किक आणि बौद्धिक लोकांना देखील ज्ञान देण्यात ते यशस्वी ठरले. गदाधर चटोपाध्याय- रामकृष्ण परमहंसजी यांच्या वडिलांचे नाव क्षुदिराम चट्टोपाध्याय, काही ठिकाणी खुदीराम, असा उल्लेख आहे तर आईचे नाव चंद्रमणीदेवी असे होते. सद्गुरु रामकृष्णजींना लहानपणी सर्वजण गदाधर या नावाने ओळखत. शिक्षणात आणि तार्किक कौशल्यात त्यांना विशेष रस नव्हता. मातीच्या मूर्ती बनवणे, संगीत आणि कथा सांगणे यामध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. सत्पुरुष आणि संन्यासी यांच्याकडून ते लहानपणी कथा ऐकत असत तथा कथा सांगतही असत. पुरीच्या मार्गावर असताना त्यांच्या कामारपुकुर गावात जर कोणी संन्यासी, विद्वान ब्राह्मण विसाव्यासाठी थांबले तर ते त्यांची सेवा करत असत.
त्यांचा तर्कशास्त्र व धार्मिक संवाद जाणून घेत असत. वडिलांच्या निधनानंतर रामकृष्णजींचे थोरले बंधू रामकुमार यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. रामकृष्णजी हे आईच्या सानिध्यात राहू लागले. घरातील कामे, देवपूजा आणि आईची सेवा करू लागले. त्यानंतर काही काळाने रामकुमार हे कोलकात्यात पुरोहित बनले. भावाच्या सहाय्यतेसाठी रामकृष्णजी सन १८५२मध्ये कोलकात्याला गेले. कोलकात्यात अस्पृश्य कैवर्त समाजातील एका जमीनदार घराण्यातील राणी रासमणीने दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले. त्यांची मदत म्हणून रामकृष्णजींनी मूर्तीच्या साजसज्जेचे दायित्व स्वीकारले. सन १८५६ साली रामकुमार यांच्या मृत्यूनंतर रामकृष्णजींनी त्यांची जागा चालवली. त्यानंतर मंदिरातच ते राहू लागले. रामकृष्णांच्या अतिभाव तन्मयतेमुळे सर्व लोक त्यांना वेडे समजू लागले. त्यांचा विवाह लावून द्यावा, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांनी विवाहाला विरोध केला नाही. कामारपुकुर गावाजवळील जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांची मुलगी शारदादेवी यांच्याशी त्यांचा विवाह करण्यात आला.
सन १८६१ साली भैरवी ब्राह्मणी यांच्याशी रामकृष्णजींची भेट झाली. भावनिक व अध्यात्मिक शक्तीमुळे त्यांचे शरीर आणि मन असह्य वेदना सहन करत होते. त्या वेदनेचा अंत करण्यासाठी भैरवी ब्राह्मणी यांनी त्यांना तंत्रसाधना करण्यास सांगितले. त्या साधनेमुळे ते बरे होत गेले. तंत्र व मंत्र साधना पूर्ण करण्यासाठी त्यांना दोन वर्षे एवढा कालावधी लागला. रामकृष्णजी हे भैरवी ब्राह्मणी यांस मातृभावनेने पुजत असत. तर भैरवी हे रामकृष्णजींना अवतार मानत असत. भैरवी यांनी त्यानंतर कुमारी पूजेची दीक्षा दिली, ज्यात कुमारिकेला देवी समजून तिची पूजा केली जाते. गुरुवर्य रामकृष्ण हे कमालीचे भावतन्मय व्यक्ती होते. कालीपूजा, रामभक्ती, कृष्णभक्ती या सर्व देवतांच्या पुजेमध्ये त्यांनी दास्यपद स्वीकारले होते. देवी कालीला ते विश्वजननी, स्वतःची आई मानत असत. त्यांनी रामभक्ती करताना स्वतःला हनुमान आणि कृष्णभक्तीवेळी स्वतःला राधा मानून भक्ती केली. त्यांची भावना एवढी प्रबळ होती, की ऊर्जेच्या स्वरूपात त्यांच्यापुढे सर्व काही प्रकट होत असे.
देवी कालीचे दर्शन, वैष्णवभक्ती, कृष्ण व रामभक्ती या सर्वांमध्ये निर्माण झालेली तल्लीनता, हे सर्वकाही त्यामुळेच घडत होते. सन १८६४ साली तोतापुरी या वेदान्तिक संन्याशाकडून त्यांनी संन्यास घेतला. तोतापुरी हे आध्यात्मिक उन्नती साधलेले सिद्ध पुरुष होते. त्यांनी त्यांना अद्बैत तत्त्वज्ञान शिकवले. तोतापुरी यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी निर्विकल्प समाधीज्ञान आणि अनुभव प्राप्त केला.
परमगुरु रामकृष्णजींना इस्लाम व ख्रिश्चन धर्मांबद्दल देखील कमालीचा आदर होता. सर्व धर्म समभाव त्यांच्या अंगी होता. जगातील सगळे धर्म म्हणजे नद्याच आहेत; ज्या शेवटी सागरास म्हणजे अद्वैत शक्तीस मिळतात, असा त्यांचा समज होता. सद्गुरु रामकृष्ण परमहंसांनी दि.१६ ऑगस्ट १८८६ रोजी महासमाधी घेतली. त्यांनंतर त्यांचे परमशिष्य स्वामी विवेकानंदजी यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेद्वारे त्यांचे धर्मकार्य सुरू ठेवले. रामकृष्णजी यांचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचे काम ही संस्था आजही करत आहे.
!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे पावन जयंतीनिमित्त त्यांना व त्यांच्या जनकल्याणी कार्यास विनम्र अभिवादन !!
✒️बापू:- श्रीकृष्णदास निरंकारी.द्वारा- प. पू. गुरुदेव हरदेव कृपा निवास, रामनगर, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३