🔸संत्रा घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी ; सुदैवाने जीवित हानी टळली !
🔹दापोरी येथे गतीरोधक बसविण्याची मागणी !
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.17फेब्रुवारी):-दापोरी येथून वरूडच्या दिशेनं संत्रा घेऊन जाणारा भरधाव ट्रॅक्टर अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर अचानक पलटी झाल्याने अपघातग्रस्त ट्रॅक्टरने इतर कोणत्याही वाहनाला धडक न दिल्यानं सुदैवानं मोठी हानी टळली आहे.गेल्या काही महिन्यांपासून अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील दापोरी बस स्टॉपवर सुरू असलेल्या अपघातांची मालिका अद्यापही कायम आहे. काल या महामार्गावर दापोरी येथे भीषण ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला असून यामधे जीवित हानी टळली.
ही अपघाताची घटना ताजी असतानाच आता अमरावती पांढुर्णा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी वाहने व याचा महामार्गावरून सालबर्डी तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाला भेटी देण्याकरिता रोज शेकडो वाहने भरधाव वेगाने धावत असताना दापोरी येथे रोजच लहान मोठे अपघात होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते. रस्त्यावरील वाहनांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या पलीकडे जाणे अत्यंत जोखमीचे व धोकादायक झालेले आहे. याठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. त्यामुळे वाहनांच्या गतीवर ब्रेक लावण्यासाठी दापोरी येथे गतिरोधक बसविणे गरजेचे बनले आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरून येणारी वाहने प्रचंड वेगाने येत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना, शेतकऱ्यांना रस्त्याच्या पलीकडे जाण्यास धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावे. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग अमरावती, जिल्हाधिकारी पवनित कौर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
अमरावती पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम झाल्या पासुन दापोरी येथे प्रचंड अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रसंगी काहींना अपंगत्व तर अनेकांचे जिव देखील गेले आहे व ही नित्याचीच बाब झाल्याने भविष्यात अपघात टाळावेत म्हणून या महामार्गावर दापोरी येथे तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावे — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य .