स्वतंत्र विदर्भाची मागणी सर्वात आधी १०० वर्षांपूर्वी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून मध्य प्रांताच्या विधिमंडळाने नागपूर येथे १ ऑक्टोबर १९३८ रोजी ‘महाविदर्भा’चे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा एकमताने ठराव मंजूर केला. ही घटना संयुक्त महाराष्ट्राच्या देखील मागणीपूर्वी घडली होती. त्यानंतर तेलंगणाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राज्यात त्या राज्यातील काही शुभचिंतक आपआपले कार्यक्षेत्र वेगळे करून मूळ राज्याचे विभाजन करू पाहत होते. त्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून शासनाचे लक्ष वेधत होते. पण हे शुभचिंतक कितपत आपल्या कार्यक्षेत्राबद्दल शुभ चिंततात. हा एक प्रश्नच आहे आणि हा प्रश्न अनुत्तरीयच राहील.यात काहीच शंका नाही. पण त्या त्या राज्यात हा लढा काही कायम दिसून आलेला नाही. लहर आली की केला कहर असंच काहीसं दिसून येत होतं.
याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्येही विदर्भाच्या पाऊलखुणा उमटायला लागल्या होत्या. यासाठी अनेक संघटनांकडून, संस्थांकडून आंदोलनामार्फत वेगळ्या विदर्भाची मागणी होत होती. काही ठिकाणी तर जनतेचा कौलही मागितल्या जात होता की, विदर्भ वेगळा हवा कि नको? स्वतंत्र विदर्भाबद्दल सतत चर्चा सुरु होती. विदर्भाचा विकास हाच या चर्चेचा मुख्य गाभा होता. पण तेलंगणाच्या मागणीप्रमाणे यात कधीही सातत्य दिसून आलेलं नाही. आता, पुन्हा विदर्भ राज्याच्या मागणीने डोके वर काढलेले पाहायला मिळत आहे. परत आधीच्याप्रमाणे जनतेचा कौल मागितल्या जात आहे.
पण मला मनापासून वाटते की, विदर्भ राज्य वेगळा होऊ नये. कारण विदर्भ वेगळा झाला, तरी सामान्य जमतेला त्याचा काहीच फरक पडणार नाही. फरक पडणार तो, फक्त राजकारणी लोकांनाच. कारण त्यांच्याच हाती सत्ता येणार आहेत. साहजिक त्यांचीच घरे पैशाने भरणार आहे. विदर्भात खूप खनिज संपत्ती आहे. पण त्याचा फायदा कधी विदर्भवासीयांना होत नाही. महाराष्ट्रात फक्त विदर्भच मागासलेला आहे. त्यासाठी एकत्र राहूनच राजकारणी लोकांनी विदर्भाचा विकास करायला पाहिजे. तेव्हाच विदर्भाचा विकास होऊ शकेल, वेगळे होऊन काहीच फायदा होणार नाही.
याउलट विदर्भ राज्य वेगळा झाला, तर भरमसाठ कार्यालये, प्रशासकीय यंत्रसामग्री इत्यादींसाठी अतोनात खर्च होईल आणि पैशाचा नाहक अपव्यय होईल. त्यामुळे अजून महागाई वाढून सामान्य जनतेच्या डोक्यावर थईथई नाचू लागेल. याचा त्रास जनतेलाच होईल.कदाचित यापूर्वीच विदर्भ वेगळा झाला असता, तर तो आतापर्यंत खूप विकसित झाला असता. पण आता खूप वेळ झाला आहे. राजकारणी लोकांनी स्वार्थीपणा सोडायला पाहिजे. जोपर्यंत ते स्वार्थीपणा सोडणार नाही, तोपर्यंत विदर्भाचा विकास होऊच शकत नाही आणि होणारसुद्धा नाही. विदर्भाविषयी इतकी आत्मीयता वाटत असेल, तर एकत्र राहूनच विदर्भाचा विकास करायला पाहिजे. राजकारणी लोकांना सामान्य जनतेच्या वतीने हिच अपेक्षा!
✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे कमळवेल्ली,यवतमाळ(भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९)