Home महाराष्ट्र ‘मोदानी’ घोटाळा गावागावांत पोहोचवणार – गोविंद यादव

‘मोदानी’ घोटाळा गावागावांत पोहोचवणार – गोविंद यादव

129

🔹गंगाखेडला संयुक्त विरोधी पक्ष संघर्ष समितीची स्थापना

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13फेब्रुवारी):-अदानी समुह आणि केंद्र सरकारच्या सहभागातून प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांचे करोडो रूपये पाण्यात गेले आहेत. केंद्र सरकारच्या थेट पाठींब्यामुळेच ही आर्थिक लूट झाली असून हा ‘मोदानी’ घोटाळा तालुक्यातील गावागावात पोहोचवण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केले.

गंगाखेड येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संयुक्त विरोधी पक्ष संघर्ष समितीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी श्री यादव बोलत होते. यावेळी संयोजक ओंकार पवार, योगेश फड, रिपब्लिकन सेनेचे राज्य सचिव यशवंतभैय्या भालेराव, शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख ( ठाकरे गट ) विष्णू मुरकुटे, डोंगरी विकास परिषदेचे संयोजक पंडीत घरजाळे, युवक कॉंग्रेसचे सिद्धार्थ भालेराव, चंद्रशेखर साळवे, संदीप राठोड, रोहिदास लांडगे, जगन्नाथ मुंडे, ईंद्रजीत हाके, भाई गोपीनाथ भोसले, अविनाश जगतकर, नागेश डमरे, रामेश्वर भोसले, सरवरभाई आदिंसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ऊपस्थिती होती.

अदानी यांच्या गैरकृत्यांमुळे स्टेट बॅंक ऑफ ईंडीया आणि एलआयसी सारख्या संस्थांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा सर्वसामान्यांचा असल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांची असताना ते ऊद्योगपतींची चौकीदारी करत आहेत, असा आरोप या प्रसंगी बोलतांना गोविंद यादव यांनी केला. कॉंग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी संसदेत या घोटाळ्याबाबत ऊपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना ऊत्तरे न देता हे प्रश्नच कामकाजातून वगळण्यात आले आहेत. ही विरोधी पक्षांची मुस्कटदाबी असून लोकशाही प्रणालीचा घात आहे. हा सर्व प्रकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुकाभर एक अभियान राबवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

या संपुर्ण गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याच्या प्रमुख मागणीसह ईतर मागण्यांचे निवेदन आज गंगाखेड तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. ओमकार पवार, भैय्या भालेराव, पंडीत घरजाळे, रोहिदास लांडगे यांची समायोचीत भाषणे झाली. प्रास्तावीक योगेश फड यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ भालेराव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here