Home महाराष्ट्र नाटकीपणा म्‍हणजे ‘नाटक’ नव्‍हे ….!

नाटकीपणा म्‍हणजे ‘नाटक’ नव्‍हे ….!

125

नाटक हा स्‍वतंत्र साहित्‍य आणि कलाप्रकार म्‍हणून अस्तित्‍वात असला, तरी या साहित्‍यप्रकाराचे लेखन रंगमंचावरील प्रायोगिक सादरीकरण लक्षात घेवूनच लिहिले जाते आणि त्‍याचे वाचन करतांनाही तीच कल्‍पना करून डोळ्यापुढे तसेच प्रसंग उभे होतात. नाटक आणि भरतनाट्यम यामध्‍ये भरतमुनींचे नाट्यशास्‍त्राचा आधार घेत अनेक साम्‍य सांगितले जातात, पण प्रत्‍यक्षात दोघांचीही स्‍वतंत्र बैठक आणि मांडणी आहे. फक्‍त कथानक, गीत आणि नृत्‍य हाच काय तो साम्‍यपणा आढळतो. नाटक कसे असावे याविषयी किंवा नाटकाचे प्रकार आणि पध्‍दत याविषयी अनेक लेखक, संशोधकांचे विचार आहेत, पण ते सर्व सर्वसमावेशक म्‍हणता येणार नाही, कारण स्‍थळ आणि कालसापेक्षता इतर कलाप्रकाराप्रमाणेच नाटकालाही लागू आहे.

प्रत्‍येक शतकामध्‍ये ह्या कलाप्रकाराने कात टाकून आपले नवीन रुप प्रेक्षकांसमोर मांडलेले आहे. नवीन रुप मांडत असताना अभिव्‍यक्‍तीला दुय्यम स्‍थान देवून व्‍यावसायिक दृष्‍ट्या केवळ प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेवून कथानक आणि पात्रांमध्‍ये बदल केले गेले, पुढे तशीच पात्रे सामान्‍यतः बहुतेक नाटकात बघायला मिळली. नंतर तर पात्रांनाच मध्‍यवर्ती ठेवून कथानकामध्‍ये बदल केला गेला. या सगळ्या घटनांमध्‍ये निर्माण झालेल्‍या पात्रांवर पूर्वी भूमिका वठविलेल्‍या कलाकाराची छाप पुढे त्‍या पात्रावर कायमस्‍वरुपी पडलेली आढळते. तमाशातील मावशी, नाच्‍या किंवा छक्‍का (तृतीयपंथी) हे पात्र वगनाट्यातून, तमाशाप्रधान नाटकाकडे प्रवास करीत असतांना जसेच्‍या तसे आले.

त्‍याची वेष, रंगभूषा आणि भाषा यामध्‍ये थोडाही बदल झालेला नाही किंवा तशी कोणी हिंमतही केली नाही. मग हळूहळू हे पात्र नाटकाचा अविभाज्‍य अंगच बनले. तशीच अनेक पात्र आजही बहुतेक नाटकांमधून सर्रास वावरत आहेत. जसे खलनायक, लावणी नृत्‍यांगना ….. अशा पात्रांच्‍या गरजेसाठी नाटकाच्‍या कथानकात तसा बदल केला जातो. प्रेक्षकांना आवडते ह्या सबबीवर असे बदल केले जातात, पण मूळात हा नाट्यनिर्मात्‍यांचा दावाच चुकीचा आहे. प्रेक्षकांना अमुक एखादी गोष्‍ट आवडते, कारण वेगळी गोष्‍ट उपलब्‍ध नसते, जुन्‍या गोष्‍टीची सवय झालेली असते किंवा नवीन गोष्‍ट प्रेक्षकांसमोर आणण्‍याची कोणी हिम्‍मत करीत नाही.

अशी हिम्‍मत न करण्‍यामागे कमी प्रयोग मिळून होणारे आर्थिक नुकसान हा एक व्‍यावसायिक विचार असेलही पण व्‍यावसायिक दृष्‍ट्याच विचार करायचे झाल्‍यास नाविण्‍यता किंवा सर्जनशिलता ही जरी उशिराने स्विकारली जात असली तरी एकदा प्रेक्षकांनी ती स्विकारली तर विक्रम घडविते. नवे विचार आणि मांडणीमूळे बसलेली बरीच नाटके असतील पण यशस्वितेची शिखरे गाठलेल्‍या नाटकांमध्‍येही सर्जनशिल विचारच होता, जो प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतलेला होता.

‘विकते तेच पिकवा’ असा दृष्‍टीकोन ठेवून नाटकांची निर्मिती होवू लागली, पण यामूळे नैतिकतेला फाटा देत आंबट शौकिनांच्‍या शौक पूर्ण करण्‍यासाठी समाज आणि संस्‍कृतीचा विसर होत आहे. व्दिअर्थी विनोद आणि नृत्‍यामधील अश्लिलता ह्या बाबी आजच्‍याच नसल्‍या तरी हा प्रकार वाढलेला आहे हे नक्‍की ! खलनायक हा अक्राळविक्राळ कर्कश आवाज असलेला हिंदी इंग्रजी डॉयलॉग वापरत आपले नाव वारंवार सांगणारा असाच का असतो. विनोदी कलाकार हसविण्‍यासाठी गरजेचे असतात हे खरे, पण ते ग्रामीण भाषा बोलणारे, चपराशी, शिपाई, नोकर, गरीब, दारुडा असेच का असतात? म्‍हातारे आईवडील फक्‍त शेतकरीच का असतात? नाटकामध्‍ये मरणारा तोंडातून रक्‍त काढूनच का मरतो? अशा अनुत्‍तरित प्रसंग आणि पात्रे नाटकांनी निर्माण केलेली आहेत, जी पहिल्‍यांदा प्रभावी ठरतात, पण नंतर हास्यास्‍पद ठरतात.

नाटक म्‍हणजे कथानकातील प्रसंगाचे मनोरंजक सादरीकरण अशी साधी आणि सोपी व्‍याख्‍या जरी केली तरी ‘मनोरंजक’ हा शब्‍दच नाटकाचा विस्‍तार आणि बदल करायला भाग पाडतो. त्‍यामूळे नाटकाची वाटचाल ‘नक्‍कल’ बनण्‍याकडे होत आहे. नाटक आणि नक्‍कल या दोहोमध्‍ये अभिनय सामान्‍य असला, तरी नाटकामध्‍ये विशेष काहीतरी आहे, जे नाटकाला नक्‍कलेपेक्षा वेगळे ठेवते. नाटकामधील अभिनय हा प्रसंगामध्‍ये जिवंतपणा निर्माण करणारा असतो, नक्‍कल ही एखाद्या प्रसंगाचा व्‍यंग असतो. नक्‍कल ही केवळ मानवी पात्रांचीच नाही तर इतरही सजीव-निर्जीवांची केली जाऊ शकते. अभिनय करणे म्‍हणजे एखादी भूमिका जगणे होय. पुलंनी एका नाटकामध्‍ये नोकराची भुमिका करायची आहे, म्‍हणून स्‍वतःच्‍याच घरी एक आठवडा नोकर बनून राहिले होते. नोकर म्‍हणून पेहराव आणि भाषा बदलली असती, पण भावनांचे काय! केवळ शरीरानेच नाही, तर त्‍या वेळापुरते नोकर म्‍हणून मनानेही स्विकारले पाहिजे, असा पुलंचा अट्टाहास होता.

मग ज्‍यावेळी एखादी भुमिका तन आणि मनाने मांडली जाते त्‍यावेळी भाषेचा असो वा वर्तनातील कृत्रिमपणा अजिबात येणार नाही. बरीच पात्रे अशी असतात, जी प्रत्‍यक्षात पाहता येत नाही, मग याआधी ज्‍या कलाकारांनी ती पात्रे साकारली असतात, त्‍याचीच नक्‍कल केली जाते, त्‍यापेक्षा वेगळे साकारण्‍याचा कोणी प्रयत्‍नच करीत नाही, प्रेक्षकांनी ते स्विकारणे किंवा न स्विकारणे ही नंतरची बाब आहे. याच भितीमूळे मग नाटकामध्‍ये नाटकीपणा वाढीस लागतो. काळ बदलत जातो, मात्र नाटकातील पात्रे तशीच राहतात. प्रेक्षकांच्‍याही विचारांना कुलूपबंद करून आहे ते स्विकारायला भाग पाडले जाते आणि त्‍याचेच भांडवल करून व्‍यावसायिक नफा साधला जातो.

एका निर्मात्‍याने प्रेक्षकांच्‍या अभिरुचीचा दाखला देत, प्रेक्षकांना आवडते तेच देण्‍याच्‍या विचाराला पुष्‍टी दिली. मग मी म्‍हणालो, ‘‘प्रेक्षकांना तर नग्‍न नाचसुध्‍दा आवडतो, बाहेरच्‍या राज्‍यांतून येणार्‍या नाच पार्ट्यांनी ते सिध्‍द करून दाखविले आहे. मग नाटकांमध्‍ये ते दाखविणार का?’’ निर्माता स्‍तब्‍ध झाला, अर्थातच त्‍याच्‍याकडे या प्रश्‍नाचे उत्‍तर ‘नाही’ असेच होते. प्रेक्षकांच्‍या अभिरुचीचा विचार व्‍हावाच पण यामधून सुवर्णमध्‍य साधत नाटकाचा कला आणि साहित्‍यप्रकार म्‍हणून असलेली पवित्र ओळख पुढील पिढीसाठी संक्रमित केली पाहिजे.

✒️नंदकिशोर मसराम(प्रायोगिक नाटक संशोधक व समीक्षक)मो:-8275187344

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here