Home चंद्रपूर बार्टी-चोर सोडून संन्यासाला फाशी!

बार्टी-चोर सोडून संन्यासाला फाशी!

279

समाजात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशासनात आणि समाजात काय स्थान आहे, असे तर कोणी विचारले तर त्याचे उत्तर फार भयानक आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना प्रशासन आणि समाज नाकारत आहे. अधिकारी चांगला असला की त्यांच्यापासून समाजाला मोठा लाभ होते. सध्या दिखाऊ आणि चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनाही समाजात स्वीकारले जाते. त्यामुळे सध्या प्रशासनात आणि समाजात कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी मिळणे कठीण झाले आहे. काही चांगले अधिकारी आहेत. त्यांना टार्गेट करून संपविण्याचे काम समाज आणि त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी करीत आहेत. कारण काय तर आतापर्यंत सढळ हाताने मिळणारा मलिदा आता हा अधिकारी खाऊ देणार नाही ही भूमिका ठेऊन कट कारस्थान रचले जात आहेत. समाजासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचा किती त्रास होते हे समजण्यापलिकडचे आहे.

बार्टीची देशपातळीवर दखल-
राज्याचा समाजकल्याण विभाग हा समाजातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी बनला आहे. देशातील पहिल्या समाजकल्याण खात्याची सुरूवात महाराष्ट्रातून स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. त्यामुळे या खात्याला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महत्त्व प्राप्त झाले. पुरोगामी महाराष्ट्रातील समाजकल्याण खात्याचा वारसा घेत इतर राज्यांनी त्याप्रमाणे सुरुवात केली. या खात्याचा मंत्रीसुद्धा त्याच समाजातील देत असत. यामागील स्पष्ट भूमिका अशी किती तो समाजाचे भले करेल. यातून समाजकल्याण सचिव, आयुक्त आणि इतर अधिकारी सुद्धा समाजाचे देणे सुरू झाले. सध्या तरी ही प्रथा महाराष्ट्रात सुरू आहे. या खात्यातूनही वेगळे काही करण्यासाठी खात्याला सपोर्टेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना ४७ वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यात करण्यात आली. त्याला दुसऱ्या भाषेत बार्टी असेही संबोधल्या जाते.

आठ वर्षात चर्चेत, तर २ वर्षांत प्रशासकीय पारदर्शकता-
गेल्या ४७ वर्षांत बार्टीने काय दिले यावर चर्चा करण्यापेक्षा गेल्या आठ ते दहा वर्षांत बार्टी काय आहे हे समाजाला समजायला लागले. गेल्या आठ वर्षांत बार्टीत चार ते पाच अधिकारी झाले. काहींना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. काहींना कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळाली. पण, त्यांना काळ गाजविता आला नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांत ही संस्था लोकांच्या घराघरांत पोहोचली. शिष्यवृत्ती असो की प्रशिक्षण असो यामध्ये पुढाकार घेऊन संख्या वाढविण्यात आली. अनेकांना त्याचा लाभ झाला. या संस्थेमध्ये पारदर्शकता येऊ लागली. लोकांचा अधिक सहभाग वाढत गेला. त्यामुळे पडद्या मागून राजकारण करणारी विदर्भ आणि पुण्यातील टोळी सक्रिय झाली. यातून मलिदा न मिळणारे अधिकच दुखावू लागले.अधिकाऱ्यावर खापर फोडता येत नाही. म्हणून दोन समाजात तेढ निर्माण करण्याची विडाच पुळपट्यांनी उचलला आहे. दोन्ही समाजातील टोळी सक्रिय झाली. यातून कटकारस्थान रचणे सुरू झाले. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांकडूच अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना हातचे बाहुले झाल्यात. बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये हे त्याच दिव्यातून जात आहेत. सहकारी आणि भ्रष्ट संघटनांचा त्रास अधिकाऱ्यांना काम करू देत नाही. याचाच फायदा जातीव्यवस्थेला बळकट करणारी संस्था घेते. महासंचालक म्हणून धम्मज्योती गजभिये यांनी २०२० मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर नव्या दमाचा अधिकारी म्हणून लवकरच त्यांनी ओळख झाली. अनुसूचित जातींमधील ५९ जातीसाठी काही तरी करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचा हुरूप वाढला. यातून त्यांनी प्रत्येक समाजाच्या संघटनांसोबत भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यातून समाजाचे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाले. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ केली. यातून समाजात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी घडावेत, हा त्यामागील उद्देश होता. तो बऱ्यापैकी यशस्वीसुद्धा झाला. बार्टीमध्ये का ताकद आहे हे त्यांनी दाखवून दिले.

व्यक्तीगत राजकारणाचे महासंचालक बळी-
गल्लीगल्लीतील कार्यक्रमात बार्टीचे फलक दिसू लागले. चांगला अधिकारी लाभल्याचा अनेकांनी गौरवही केला. मात्र, चांगल्यासोबत काही वाईटसुद्धा येते हा निसर्ग नियम आहे. तोच प्रकार महासंचालक गजभिये यांच्यासोबत घडला. गेल्या अनेक वर्षांत बार्टीला चांगला आणि सक्षम अधिकारी मिळाला. समाजातील प्रत्येकाच्या भल्याचा विचार करणारा अधिकारी मिळाला. त्यामुळेच बार्टीही आज घराघरांत पोहोचली आहे. बार्टीच्या बाजूने लिहिणाऱ्यांसोबत त्यातील उणिवाही सांगणारा वर्ग पुढे आला. हे शक्य करून दाखविले धम्मज्योती गजभिये यांनी. मात्र, नागासारखे गेल्या अनेक वर्षांत बार्टीच्या बिळात बसलेले मानवी नागांना हे पाहवले नाही. कारण त्यांच्यातील इगो दुखावला. तत्त्वाने आणि नेटाने चालणाऱ्या अधिकाऱ्यापुढे स्वार्थ साधता येत नाही म्हणून त्यांच्यांतील अहंकार जागृत झाला. यातूनच महासंचालक गजभिये यांच्याविरोधात कटकारस्थान करणे सुरू झाले. त्यांच्या विरोधात जाणून बुजून बातम्या पेरणारी टोळी तयार झाली. त्यांना माहिती देणारा वर्गही तिथेच तयार झाला. यामुळे बार्टीची बदनामी सुरू झाली. पुणे, नागपुरातून त्याचे कट शिजू लागले. त्यांच्या विरोधात जो बोलले त्या तत्त्वहीन व्यक्तीला सोबत घेऊन आंदोलन निवेदन देणे सुरू झाले. लहानसहान निर्णयावरून धारेवर धरणे सुरू झाले. याला महासंचालक कसे दोषी आहेत हे रंगवून सांगण्यात येऊ लागले. वर्तमानपत्रातील मोठमोठे रकाने भरून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांच्याविरोधात जे काही करता येईल साम,दाम, दंड आणि भेद नीतीने विरोध करू लागले. कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून कार्यालयातच विरोधात कट शिजवू लागले. काही सामाजिक संघटनांच्या लोकांना धरून निवेदन देणे, मोर्चे काढणे, कार्यालयात नसताना आपणच मोठा अधिकारी असल्याचा आव आणून इतर कर्मचाऱ्यांना टार्गेट करणे सुरू झाले. हा वाद विकोपाला गेला. भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली म्हणून त्यांनाच पदमुक्त करण्याचा घाणेरडा प्रकार करण्यात आला. यातून विरोध करणाऱ्यांना काय साधले याचे उत्तर देता येणार नाही. दोन समाजातील वाद आहे हे दाखवून जातीयवादी आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेत आहेत. या मात्र,समाजाचे मोठे नुकसान होत आहे. भ्रष्टाचाराने कुरण म्हणून ओळख असलेली बार्टीची प्रतिमा गेल्या दोन वर्षांत स्वच्छ झाली. मात्र, जातीयवादी शक्तींनी पुन्हा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पकडून बार्टीचे मातेरे करण्याचा घाणेरडा आणि लाजीरवाणा प्रकार सुरू केला आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली म्हणून आगतांडव-
गेल्या काही महिन्यापासून बार्टीमध्ये जातीय राजकारण करण्यात येत आहे.त्यामुळे प्रशासकीय वातावरण दूषित होऊन विविध योजनांची अंलबजावणी करण्यावर परिणाम होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा संदर्भात मोठी लाच मागण्याचा प्रकार झाल्याचे कळते. यामुळे सहायक व्यवस्थापकावर कारवाई करून पदमुक्त करण्यात आले होते. त्या व्यक्तींनी १० लाखांची मागणी केल्याचा आरोप होता. बोगस विद्यार्थी प्रकरण हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. बार्टीने प्रशिक्षणाचे दिलेले कंत्राट रद्द केले आहे. मात्र यातील यातील कार्यमुक्त संदिग्ध व्यक्ती वारंवार बार्टीच्या कार्यालयात येऊन एका जबाबदार अधिकाऱ्यांसोबत वारंवार भेटी घेत आहे. लाच प्रकरणाचा आरोप व्यक्तीसोबत वारंवार भेटणे हे बार्टीच्या दृष्टिने योग्य नाही. या प्रकरणात निबंधकासह त्या व्यक्तींची चौकशी होणे आवश्यक आहे. महासंचालकांनी निबंधकांची विभागीय चौकशी करण्यासंदर्भात वरिष्ठांना पत्र पाठविले होते. तसेच निबंधकांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण मॅटमध्ये गेले. तिथे आदेशाला स्थगिती दिली होती. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणातील महासंचालकाने विभागीय चौकशीसंदर्भात पाठविलेल्या पत्राची दखल सरकारने घेतली नाही. सरकार विभागीय चौकशीचे आदेश कधी देते हे पाहणे आवश्‍यक आहे.

✒️सुरेश डांगे(संपादक-साप्ताहिक पुरोगामी संदेश)मो:-8605592830

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here