✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.8फेब्रुवारी):- येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत लोकनिर्माण ग्रामिन विकास व संशोधन संस्था महाराष्ट्र या नामांकित संस्थेच्या वतीने संभाजीनगर औरंगाबाद येथे त्यांना राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार प्रदान करून येथेच्छ सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे देशभरातील निवडक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानाचा भगवा फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवराच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
वंचित, पीडित, शोषित, शेतकरी, शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य आत्तापर्यंत संजय आडे यांनी केले आहे. दीन दुबल्यांचा वाली अशी ओळख पुसद तालुक्यात संजय आडे यांची आहे. अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या उच्च विद्याविभूषित तज्ञ मंडळीच्या संपर्कात राहून ते ग्राउंड लेव्हल वरील वंचितांच्या समस्येला वाचा फोडतात, संघर्ष करतात प्रसंगी आंदोलनही छेडतात. समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक कामाचा धडाका सुरू ठेवला असून त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी धर्मगुरू तथा दशनाम गोसावी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कृष्णदेव गिरी, सुप्रसिद्ध पत्रकार सुरेश राठोड, लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या डॉक्टर अर्चना मेडेवार, लोक तांत्रिक लोकराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित कुमार चौधरी, क्राईम्स स्पेक्ट्रम रिसर्च रिसर्च फाउंडेशन जया गांधी राष्ट्रीय पर्यावरण मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, मध्यप्रदेश, बिहार, तामिळनाडू, महाराष्ट्र यासह देशभरातून आलेले मान्यवर उपस्थित होते.
त्यांची ही निवड देशभरातून झाली आहे हे विशेष. पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन साक्षी गिरी व अंजली मॅडम यांनी केले तर आभार डॉक्टर अर्चना मेडेवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांच्या या यशाबद्दल देशभरातील अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.