✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
धुळे(दि.1फेब्रुवारी):-आपण हल्ली नेहमी वर्क फ्रॉम होमबाबत ऐकत असतो. बहुतेक मोठमोठया कंपन्यांनी सध्या आपल्या कर्मचा-यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे आणि हा प्रकार लॉकडाऊनपासून मोठया प्रमाणात सुरु झालेला आहे, त्यात वेगळे असे काहीच नाही. परंतु याचाच फायदा आता सायबर गुन्हेगार घेत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना फसवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे नवनविन मार्ग वापरत आहेत. आजकाल, वर्क फ्रॉम होम जॉब ऑफरशी संबंधित विविध प्रकारचे बनावट संदेश प्रसारीत केले जात आहेत. ज्यामध्ये तुमची “वर्क फ्रॉम होम जॉब ऑफर” साठी निवड झाली आहे. तुम्हाला दररोज ८ ते ३० हजार रुपये पेमेंट मिळेल तेही कोणत्याही प्रकारची गुंतवणुक न करता, अशा प्रकारचे बनावट संदेश नागरीकांना पाठवित असतात.
त्यात सायबर गुन्हेगार आपल्याला सांगतो की, तुम्हाला खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल व क्लिक केल्यानंतर एक नविन विंडो फाईल ओपन होते जी सायबर गुन्हेगाराच्या मोबाईलशी कनेक्ट असते. त्यानंतर जर आपण समोरच्या व्यक्तीशी ऑनलाईन बोलणे सुरु केले तर तो आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब ऑफर बाबत सांगतो आणि बोलता बोलता आपल्याला सांगतो की आपल्याला एक लिंक पाठवत आहे त्या लिंकवर आपण क्लिक करुन नॉमिनल रजिस्ट्रेशन फी मात्र दहा रुपये भरावी लागेल.
याच ठिकाणी सामान्य मावणूस फसतो. कारण सदरील लिंक ही बनावट लिंक असते. कारण या लिंक व्दारे सायबर गुन्हेगार आपली खाजगी माहिती / बँकेशी संबधित गोपनीय डिटेल्स मिळवतात. म्हणून जर आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब ऑफरचे मॅसेज आले असेल तर त्याला दुर्लक्ष करा किंवा डिलीट करा, जर त्या मॅसेजमध्ये त्यांनी फोन नंबर दिला असेल तर त्यांना कॉल करु नका किंवा लिंक दिली असेल तर त्या लिंकवर क्लिक करु नका, आपली कोणतीही खाजगी माहिती शेअर करु का व सायबर गुन्हेरांपासून सावध रहा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.