Home महाराष्ट्र मायबोलीचे संवर्धन करून अस्मिता जपा – मा. नंदकुमार शेडगे

मायबोलीचे संवर्धन करून अस्मिता जपा – मा. नंदकुमार शेडगे

134

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड (दि.31जानेवारी):-“जन्मभूमी, कर्मभूमी, जन्मदात्री आई आणि मायबोली यांना कधीही विसरू नका कारण यांचे  ऋण न फेडता येणारे असते. मराठी भाषेचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून दैनंदिन जीवनात जेथे जाल तेथे मराठी भाषेचा वापर करा. साहित्यिक साहित्यातून ज्ञानदान करत असतो.  साहित्याची भक्ती करा, निश्चितच मराठी भाषेचे संवर्धन होईल. साहित्य लिहिताना सातत्य ठेवून मराठी भाषेसाठी चौफेर लेखन केले पाहिजे.  मराठी भाषेची अस्मिता आणि अभिमान बाळगला पाहिजे.

” असे मत प्रा. नंदकुमार शेडगे यांनी व्यक्त केले.  ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव हे होते. 

    प्रा. नंदकुमार शेडगे पुढे म्हणाले की, “मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्था प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी आपली मराठी भाषा आहे. या मातृभाषेचे संरक्षण आपण सर्वांनीच केले पाहिजे. मराठी भाषेने संस्कृती, संस्कार आणि धर्म दिला. त्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे.” असे सांगून विनोदी कथाकथन आणि आई विषयक कवितांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्याना मंत्रमुग्ध केले. यावेळी मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर, शुद्धलेखन, काव्यवाचन आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

     अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव म्हणाले की, “मराठी भाषेत अथांग असा ज्ञानाचा सागर असून आपण ते ज्ञान पुस्तके वाचून ग्रहण केले पाहिजे. मराठी भाषेतूनच दैनंदिन लिहीत रहा, वाचन करा. व्यक्त व्हा. कारण तुम्हाला यश प्राप्त करून देणारी ही मराठी भाषाच असते. मराठी भाषेत करिअरच्या अफाट संधी आहेत. असेही ते म्हणाले.स्वागतपर प्रास्ताविक सादर करताना मराठी विभागाचे प्रा. संतोष बोंगाळे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याविषयीची भूमिका सांगून मराठी भाषेचे महत्व विषद केले.यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय एम. ए. भाग दोन ची विद्यार्थिनी सौ. उमा पोळ यांनी करून दिला तर  कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. ए. बी. मुळीक यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. डॉ. व्ही आर. लोंढे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here