✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.31जानेवारी):-दिव्यंगत्व टक्केवारीत तफावत आढळल्याने २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ५२ शिक्षकांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यानंतर प्राप्त अहवालानुसार आणखी संशयित दिव्यांग २६ शिक्षक रडारवर आले आहेत. या शिक्षकांची ३१ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सीईओंसमोर सुनावणी होणार आहे.
प्राथमिक शिक्षक संवर्गातील सर्वसाधारण बदल्यांतर्गत शिक्षक, कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे पाल्य, नातेवाइकांनी त्यांच्याकडील दिव्यांग प्रमाणपत्रानुसार स्वारातीमध्ये अपंग मंडळापुढे वैद्यकीय पुर्नतपासणी करून घेतली होती. यातील ५२ शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व टक्केवारीबाबतचा अहवाल प्राप्त झाला.
ऑनलाइन बदली प्रक्रियेच्या अर्जासोबत दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीमध्ये आणि अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून पुनर्तपासणी होऊन आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र पुनर्तपासणी अहवालातील दिव्यांग टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ५२ शिक्षकांना निलंबित केले होते. आता पुन्हा २६ शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यांच्या दिव्यांगत्वातही तफावत आढळल्याने मंगळवारी ही सुनावणी ठेवण्यात आली आहे.