नामदार अब्दुल सत्तार कर्मयोगी लोकनेते — लक्ष्मणराव पाटील
सिल्लोड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
सिल्लोड(दि.29जानेवारी):- – सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार, लोकप्रिय लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा.ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या भेटीचा अतिशय विलक्षण योग जुळून आला.मा.ना.अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील जनसंपर्क कार्यालयात प्रवेश केला असता समोरच धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा बघितली. आज दिघे साहेबांची जयंती त्यानिमित्ताने प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
आज महाराष्ट्र राज्याचे राजकारण प्रचंड ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातील लोकांच्या मनिध्यानी देखील नव्हतं असं बरंच काही घडून गेलं आणि अजूनही घडतंय. शिवसेना पक्षातून एक गट स्वतंत्र झाला आणि त्यांनी आपली स्वतंत्र भूमिका घेऊन मा.ना.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप सोबत सरकार स्थापन केले. शिंदे गटातील काही निवडक आमदारांच्या भूमिकेला टोकाचा विरोध झाला आणि त्यात सर्वात जास्त जर कोणाला विरोध झाला असेल तर ते म्हणजे सिल्लोड – सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार होय.
एवढा प्रचंड गदारोळ आणि विलक्षण विरोधात असलेलं वातावरण यामधून मार्ग काढणं खूपच अवघड कार्य. राज्यातील सर्व जनतेला असं वाटतंय की, अब्दुल सत्तार आगामी निवडणुकीत नक्कीच पराभूत होतील. सर्व राज्यभरात लोकांच्या प्रतिक्रिया आणि प्रचंड गाजलेला दसरा मेळावा. या सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये दडलेला पत्रकार मला स्वस्थ बसू देत नव्हता. नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी थेट सिल्लोड ला येऊन पोहचलो.
अब्दुल सत्तार साहेबांची भेट घेण्याच्या अगोदर मी सिल्लोड शहरातील अनेक नागरिकांना भेटलो आणि सर्वांना एकच प्रश्न विचारला, आगामी निवडणुकीत सत्तार साहेब निवडून येतील का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी लोकांनी हो असं दिल्यानंतर मात्र मी थोडा विचारात पडलो. राज्यातील लोकांच्या प्रतिक्रिया आणि अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया यामध्ये प्रचंड तफावत जाणवली. तद्नंतर मी काही निवडक लोकांना प्रश्न विचारायला सुरवात केली. मी विचारले की सत्तार साहेबांनी तर अशी भूमिका घेतली, लोक विरोध करताय, चुकीचं झालं असं म्हणताय, ते पराभूत होतील…अशा एक न अनेक गोष्टींचा उहापोह केल्यानंतर मला लोकांनी एकच उत्तर दिलं, साहेब लोक काहीही म्हणतील पण आमच्या आमदारांनी खूप विकासकामे केली आहेत त्यामुळे तेच निवडून येतील.
मग मी पुन्हा उलटसुलट प्रश्न विचारायला सुरवात केली, लोकांवर प्रश्नाचा भडिमार केला तरीसुद्धा लोकांची प्रतिक्रिया तीच होती की, काहीही झालं तरी सुद्धा सत्तार साहेब १००% निवडून येतील. विशेषतः हे एवढ्या आत्मविश्वासाने सांगणारे बहुसंख्य लोक मुस्लिम नाही तर हिंदू होते. आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. मनात विचार केला की, अशा लोकप्रिय लोकनेत्याची भेट घेतलीच पाहिजे. जेव्हा मी प्रत्यक्षपणे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली तेव्हा अनेक गोष्टीं सहजपणे उलगडायला लागल्या. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा थेट प्रत्यय आला. जात – पात, धर्म याच्यापलीकडे जाऊन तुम्ही जर कर्माला पूजा समजून कार्य केलं तर तुम्ही नक्कीच लोकांच्या मनात अधिष्ठान मिळवू शकतात याची अनुभूती मिळाली.
मतदारसंघात सहकार, शिक्षण, वाणिज्य व व्यापार, उदयोग व्यवसाय इ. क्षेत्रातील पूर्णत्वास आलेली सर्व विकासकामे अब्दुल सत्तार यांच्याबद्दल खूप काही सांगून जातात. कृषीमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सत्तार साहेबांनी दिली. या सर्व बाबींवरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते माणूस कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे यापलीकडे विचार करून जर तो माणूस विकासाच्या नावावर मते मागत असेल तर जनता नक्कीच विश्वास ठेवते. राजकारणाच्या पलीकडे विकासकामे करणारा लोकनेता म्हणून सत्तार साहेब मनाला भावले, यात तिळमात्र शंका नाही.